मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Dasara Melava 2022 : दसरा मेळाव्यासाठी शिवसेना व शिंदे गटाचा प्लॅन ‘बी’, आता ‘या’ जागेसाठी चढाओढ !

Dasara Melava 2022 : दसरा मेळाव्यासाठी शिवसेना व शिंदे गटाचा प्लॅन ‘बी’, आता ‘या’ जागेसाठी चढाओढ !

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Sep 14, 2022 07:52 PM IST

Dasara Melava 2022 : शिवसेनेचा परंपरागत मेळावा शिंदे गट घेणार की, उद्धव ठाकरे गट घेणार यासाठी संघर्ष सुरू असून आता हा मेळावा शिवाजी पार्क म्हणजे शिवतीर्थावर होणार की अन्य ठिकाणी याची उत्सुकता निर्माण झाली आहे.

दसरा मेळाव्यासाठी शिवसेना व शिंदे गटाचा प्लॅन ‘बी’
दसरा मेळाव्यासाठी शिवसेना व शिंदे गटाचा प्लॅन ‘बी’

Shiv Sena Dasara Melava 2022 : शिवसेनेचा परंपरागत मेळावा शिंदे गट घेणार की, उद्धव ठाकरे गट घेणार यासाठी संघर्ष सुरू असून आता हा मेळावा शिवाजी पार्क म्हणजे शिवतीर्थावर होणार की अन्य ठिकाणी याची उत्सुकता निर्माण झाली आहे. शिवाजी पार्कवर मेळाव्यासाठी मुंबई महापालिकेने परवानगी न दिल्यास शिवसेनेने अन्य पर्यायांचा शोध सुरू केला आहे. शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी एमएमआरडीएला (MMRDA) पत्र लिहीत बीकेसीतील मैदानाची (BKC Ground)मागणी केली आहे. त्याचबरोबर शिंदे गटाकडून बांद्रा-कुर्ला संकुलासाठी चाचपणी सुरू आहे.

शिवसेनेच्या भारतीय कामगार सेनेमार्फत दसरा मेळाव्याच्या आयोजनासाठी पत्र लिहिलं आहे. उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी मेळावा शिवतीर्थावरच घेणार असल्याचे म्हटले होते. मात्र आता पर्यायी जागांचा शोध सुरू झाला आहे. दुसरीकडे एकनाथ शिंदे सुद्धा दसरा मेळावा घेण्यावर ठाम आहेत. मंगळवारी शिंदे गटातील आमदार, खासदार, नगराध्यक्ष व लोकप्रतिनिधींची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत दसरा मेळावा आयोजनावर चर्चा करण्यात आली. या बैठकीनंतर मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले की, शिंदे गटाचा दसरा मेळावा ५ ऑक्टोबर रोजी घेतला जाईल मात्र ठिकाण अद्याप निश्चित नाही. तसे एकनाथ शिंदे शिवाजी पार्कवरच दसरा मेळावा घेण्यासाठी आग्रही आहेत.

दरम्यान शिवाजी पार्कवर मेळाव्यास परवानगी मिळाली नसल्यास पर्यायी जागांचा शोध दोन्ही गटाकडून सुरू आहे. शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी नुकताच वांद्रा कुर्ला संकुलाच्या मैदानाचा उल्लेख केला होता. त्यामुळे शिवाजी पार्कवर परवानगी नाही मिळाली तर शिंदे गटाचा मेळावा वांद्रे कुर्ला संकुलातील मैदानावर होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे शिवसेनेनं मागितलेल्या परवानगीमुळं शिवाजी पार्कनंतर बीकेसीतील मैदानासाठीही शिवसेना आणि शिंदे गट यांच्यात चढा-ओढ सुरु होण्याची शक्यता आहे.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या