मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Sanjay Raut: संजय राऊतांचा मुक्काम आता ऑर्थर रोड तुरुंगात, न्यायालयीन कोठडीत रवानगी

Sanjay Raut: संजय राऊतांचा मुक्काम आता ऑर्थर रोड तुरुंगात, न्यायालयीन कोठडीत रवानगी

Suraj Sadashiv Yadav HT Marathi
Aug 08, 2022 01:56 PM IST

Sanjay Raut: पत्राचाळ प्रकरणी ईडीने अटक केल्यानंतर संजय राऊत ३१ जुलैपासून ईडी कोठडीत होते. आज ईडी कोठडीची मुदत संपत असल्याने त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते.

शिवसेना खासदार संजय राऊत
शिवसेना खासदार संजय राऊत (फोटो - पीटीआय)

Sanjay Raut: शिवसेना खासदार संजय राऊत यांना पत्राचाळ प्रकरणी २२ ऑगस्ट पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. ३१ जुलै रोजी अटक करण्यात आल्यानंतर ते आतापर्यंत ईडीच्या कोठडीत होते. आता राऊतांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून त्यांचा मुक्काम आजपासून ऑर्थर रोड तुरुंगात असणार आहे. ईडी कोठडी संपल्यानं त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. संजय राऊत यांच्या वकिलांनी आज जामिनाची मागणी केली होती. मात्र संजय राऊत यांच्या पत्नीच्या खात्यातून झालेल्या व्यवहारांची चौकशी करायचे असल्याचं सांगत ईडीने कोठडी वाढवून मागितली होती. 

पत्राचाळ प्रकरणी ३१ जुलैपासून संजय राऊत हे ईडी कोठडीत आहेत. आजपासून त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. ईडी कोठडीची मुदत संपल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यावेळी ईडीकडून कोठडीची मागणी करण्यात आली नाही. त्यामुळे आता संजय राऊत यांना १४ दिवस न्यायलयीन कोठडी सुनावली आहे. संजय राऊत यांना आता ऑर्थर रोड तुरुंगात ठेवण्यात येणार आहे. दरम्यान, संजय राऊत ईडी कोठडीत असताना पत्राचाळ आणि मनी लाँड्रिंग प्रकरणी त्यांच्या पत्नी वर्षा राऊत यांनाही ईडीने समन्स बजावले होते. दोघांचीही समोरासमोर चौकशी करण्यात आली. संजय राऊत यांना ऑर्थर रोड तुरुंगात घरचं जेवण आणि औषधांसाठी न्यायालयाने परवानगी दिली आहे. गेल्या ८ दिवसांपासून संजय राऊत यांची ईडी कोठडीत चौकशी करण्यात आली. या चौकशीत महत्त्वाची माहिती हाती लागल्याचा दावा ईडीकडून करण्यात आला आहे.

पत्राचाळ घोटाळ्यात संजय राऊत यांचा थेट सहभाग असल्याचा आरोप ईडीने केला आहे. प्रविण राऊत हे पत्राचाळ डेव्हलपमेंट पाहत होते. त्यांना एचडीआयएल ग्रुपने ११२ कोटी रुपये दिले आणि त्यापैकी १ कोटी ६ लाख ४४ हजार रुपये संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना पाठवल्याचा दावा ईडीने केला आहे. याच पैशामधून संजय राऊत यांनी अलिबागमध्ये जमीन खरेदी केली होती. पत्राचाळ आर्थिक गैरव्यवहारात संजय राऊत यांच्या कुटुंबाला आर्थिक फायदा झाल्याचंही ईडीने म्हटलं आहे. संजय राऊतांकडून प्रविण राऊत यांच्यामार्फत सर्व व्यवहार करत होते असा आरोपही ईडीने केला आहे.

IPL_Entry_Point