मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  भाजप पुरस्कृत CM होताच मराठी माणसाचा अपमान सुरू; राऊतांचे 'एक तीर अनेक निशाने'

भाजप पुरस्कृत CM होताच मराठी माणसाचा अपमान सुरू; राऊतांचे 'एक तीर अनेक निशाने'

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Jul 30, 2022 10:14 AM IST

Sanjay Raut on Bhagat Singh Koshyari: शिवसेना खासदार संजय राऊतांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींच्या वादग्रस्त वक्तव्यावरून शिंदे सरकारवर टीका केली आहे. राऊतांनी चार खोचक ट्विट्स करत मुख्यमंत्री शिंदे, राज्यपाल कोश्यारी आणि बंडखोर आमदारांवर निशाणा साधला आहे.

MP Sanjay Raut On CM Eknath Shinde
MP Sanjay Raut On CM Eknath Shinde (Anshuman Poyrekar/HT PHOTO)

Bhagat Singh Koshyari Controversial Statement On Mumbai : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्र आणि मुंबईबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळं राज्यातील राजकीय वातावरण तापलेलं आहे. काल एका कार्यक्रमात बोलताना राज्यपाल कोश्यारी म्हणाले होते की, राजस्थानी आणि गुजराती मुंबई सोडून गेले तर मुंबईत पैसाच उरणार नाही, आणि मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी राहणार नसल्याचं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं, त्यानंतर आता त्यांच्यावर कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेनं टिकास्त्र सोडलं आहे.

शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊतांनी राज्यपालांच्या या वादग्रस्त वक्तव्यावर सडकून टीका केली आहे. त्यांनी ट्विट करून शिंदे सरकारवरही जोरदार निशाणा साधला आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटलंय की, महाराष्ट्रात भाजपा पुरस्कृत मुख्यमंत्री होताच मराठी माणूस आणि शिवरायांचा अपमान सुरू झाला, स्वाभिमान अभिमान यावर बाहेर पडलेला गट हे ऐकूनही गप्प बसणार असेल तर शिवसेनेचे नाव घेऊ नका, मुख्यमंत्री शिंदे, राज्यपालांचा साधा निषेध तरी करा, मराठी कष्टकरी जनतेचा हा अपमान आहे, ऐका, ऐका. असं म्हणत राऊतांनी शिंदे सरकारवर टीका केली आहे.

राज्यपालांच्या या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध करताना राऊतांनी धडाधड चार ट्विट्स केले आहे, त्यात त्यांनी म्हटलंय की, थोडक्यात काय तर महाराष्ट्र व मराठी माणूस भिकारडा आहे, १०५ मराठी हुतात्म्यांचा असा अपमान मोरारजी देसाई यांनी देखील केला नव्हता, मुख्यमंत्री शिंदे, ऐकताय ना, की तुमचा महाराष्ट्र वेगळा आहे, स्वाभिमानाचा अंश उरला असेल तर आधी राज्यपालांचा राजीनामा मागा, दिल्ली पुढे किती झुकताय?, असा सवाल राऊतांनी शिंदेंना विचारला आहे.

त्याचबरोबर शिवसेनेच्या आमदारांनी बंड केल्यानंतर सर्व आमदार गुवाहाटीत गेले होते, त्यावेळी शिवसेनेचे बंडखोर आमदार शहाजी पाटील यांची 'काय झाडी, काय डोंगार, काय हाटील' अशा वक्तव्याची ऑडिओ क्लिप मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली होती, त्याचा आधार घेत राऊतांनी शिंदे सरकारच्या बंडखोर आमदारांवर खोचक टीका केली आहे. त्यांनी म्हटलंय की, काय ती झाडी..काय तो डोंगर..काय नदी..आणि आता...काय हा मराठी माणूस ..महाराष्ट्राचा घोर अपमान! ५० खोके वाले आता कोणत्या झाडी डोंगरात लपून बसलेत?, असा सवाल करत राऊतांनी राज्यपाल आणि बंडखोर आमदारांसहित मुख्यमंत्री शिंदेंवर टीका केली आहे.

आता तरी..ऊठ मराठ्या ऊठ..शिवसेना फोडून बुळबुळीत सरकार का आणले याचा खुलासा भाजपा राज्यपालांनी केला आहे..बुळबुळीत गटाचे लोक उठणार नाहीत..मराठ्या तुलाच उठावे लागेल, असंही ट्विट करत राऊतांनी मराठी अस्मितेला आणि मराठी माणसाला राज्यपालांच्या या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध करण्याची साद घातली आहे.

IPL_Entry_Point