मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Vinayak Mete : विनायक मेटेंच्या निधनानं राज्यात शोककळा; सर्वपक्षीय नेत्यांनी जागवल्या आठवणी!

Vinayak Mete : विनायक मेटेंच्या निधनानं राज्यात शोककळा; सर्वपक्षीय नेत्यांनी जागवल्या आठवणी!

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Aug 14, 2022 11:29 AM IST

Vinayak Mete Passed Away : आज पहाटे मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर झालेल्या कार अपघातात शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायक मेटे यांचं निधन झालं आहे. त्यामुळं सर्वपक्षीय नेत्यांनी मेटेंच्या आठवणींना उजाळा देत शोक व्यक्त केला आहे.

Vinayak Mete Passed Away
Vinayak Mete Passed Away (HT_PRINT)

Vinayak Mete Car Accident : शिवसंग्राम पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आणि माजी आमदार विनायक मेटे यांचं आज पहाटे झालेल्या कार अपघातात निधन झालं आहे. त्यामुळं राज्यातील अनेक नेत्यांनी शोक व्यक्त केला असून ही राज्याच्या राजकारणातली मोठी हानी असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळं विनायक मेटेंना श्रद्धांजली वाहताना कोणत्या नेत्यानं त्यांच्या आठवणींना कसा उजाळा दिला, जाणून घेऊयात.

विनायक मेटेंच्या निधनानंतर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मराठा समाजाला न्याय देण्यासाठी मेटे यांच्यात जी तळमळ होती, त्या भावनेसोबत आमचं सरकार राहणार आहे, त्यांच्या कुटंबियांच्या दुखात आम्ही सहभागी असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी जारी केलेल्या शोकसंदेशात म्हटलंय की, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी मी आजच मुंबई येथे बैठक बोलावली होती. त्या बैठकीला मेटे उपस्थित राहणार होते.

या बैठकीपुर्वीच काळाने त्यांना आपल्यातून हिरावून नेले. त्यांच्या निधनाने मराठा आरक्षण चळवळीचे न भरून निघणारे नुकसान झाले आहे. अरबी समुद्रातील शिवस्मारक आणि मराठा आरक्षणाच्या मुद्यावर तळमळीने बोलायचे. शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, कामगार, गरीब लोकांना त्यांचे हक्क आणि न्याय मिळवून देण्यासाठी ते कायम लढत राहिले. मेटे यांच्या निधनाने मराठा समाजाचा एक बुलंद आवाज आज हरपला आहे. या धक्क्यातून सावरण्याचे बळ मेटे कुटुंबियांना मिळो, अशी भावना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे.

...हीच मेटेंना खरी श्रद्धांजली ठरेल- नितिन गडकरी

विनायक मेटेंच्या अपघाताचं नेमकं काय कारण आहे, हे मला माहिती नाही, परंतु आता प्रत्येकानं संवेदनशिल नागरिक होऊन भारताला अपघातमुक्त करायला हवं, तीच विनायक मेटेंना खरी श्रद्धांजली असणार आहे, त्यांचं अपघातात झालेलं निधन ही दुर्दैवी घटना असून त्यांच्या आत्म्याला शांती मिळो, हीच माझी प्रार्थना असल्याची भावना केंद्रिय मंत्री नितिन गडकरी यांनी व्यक्त केली आहे.

मोठ्या सामाजिक नेत्याला महाराष्ट्र मुकला- शरद पवार

आजची सकाळ ही धक्कादायक आहे, कारण मला सकाळी विनायक मेटेंच्या निधनाची बातमी समजली, एका सामान्य शेतकरी कुटुंबात जन्माला आलेल्या आणि कष्टानं आपलं नेतृत्त्व तयार केलेल्या विनायक मेटे आज आपल्यात नाहीत, सामाजिक प्रश्नांवर त्यांचं नेहमीच लक्ष असायचं, अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक व्हावं, अशी त्यांची इच्छा होती, अत्यंत बारकाईने आणि अभ्यासू पद्धतीनं अनेक विषयांवर लक्ष देणारे ते नेते होते, अचानक आज झालेल्या अपघातानं महाराष्ट्र आज एक मोठ्या सामाजिक नेत्याला मुकला आहे, असं मेटेंना श्रद्धांजली देताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले.

मराठा चळवळीचं खंबीर नेतृत्वं हरपलं- अजित पवार

विनायकराव मेटे यांच्या अपघाती निधनाची बातमी ऐकून धक्का बसला. त्यांच्या निधनानं मराठवाड्याचा कर्तृत्ववान सुपुत्र, मराठा चळवळीचं खंबीर नेतृत्वं हरपलं आहे, मी माझा निकटचा सहकारी गमावला आहे, अशा शब्दात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मेटेंना श्रद्धांजली वाहिली आहे.

मराठा समाजाला नेतृत्व देणारं व्यक्तिमत्व हरपलं-फडणवीस

विनायक मेटे यांच्या निधनाचं वृत्त हे अतिशय धक्कादायक असून त्यांच्या कार्यकर्त्यांना आणि कुटुंबियांना दुख पचवण्याची शक्ती मिळो, अशी मी प्रार्थना करतो, असं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. अतिशय कष्टातून आणि गरिबीतून दिवस काढत समाजकार्यासाठी त्यांनी स्वत:ला झोकून दिलं होतं. मागास भागाचा विकास आणि मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी त्यांनी नेहमी आक्रमक भूमिका घेतली होती. एखाद्या विषयाचा पाठपुरावा करून तो विषय मार्गी कसा लावायचा हे त्यांना चांगलं ठाऊक होतं, त्यांच्या जाण्यानं मराठा समाजाचं एक मोठं नेतृत्त्व हरपल्याची भावना उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे.

मराठा आरक्षणासाठी लढणारा मोठा माणूस गेला-चंद्रकांत पाटील

सातत्यानं मराठा आरक्षणासाठी राजकीय भूमिका घेणारा आणि लढणारा मोठा माणूस गेल्याचं राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे, मराठा आरक्षणासंदर्भात आज एक मिटिंग होती, त्यासाठी ते मुंबईत येत होते, असंही पाटील म्हणाले.

IPL_Entry_Point