मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Sharad Pawar : खुशाल चौकशी करा; मात्र आरोप खोटे ठरले तर काय करणार? ; पत्राचाळ घोटाळ्यातील आरोप शरद पवारांनी फेटाळले

Sharad Pawar : खुशाल चौकशी करा; मात्र आरोप खोटे ठरले तर काय करणार? ; पत्राचाळ घोटाळ्यातील आरोप शरद पवारांनी फेटाळले

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Sep 21, 2022 01:41 PM IST

Sharad Pawar On Patra Chawl Scam : पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी संजय राऊत, शरद पवार आणि तेव्हाचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांची बैठक झाली होती. या घोटाळ्यात शरद पवार यांचा सहभाग असून त्यांची चौकशी करण्याची मागणी भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केली होती. हे आरोप शरद पवार यांनी फेटाळले असून लवकरात लवकर चौकशी करा अशी मागणी त्यांनी केली आहे.

NCP Chief Sharad Pawar
NCP Chief Sharad Pawar (Vijay Bate)

मुंबई : पत्राचाळ घोटाळ्या प्रकरणात शरद पवार यांचाही सहभाग असून त्यांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केली होती. याला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही त्याला दुजोरा दिला होता. यावरून राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहे. या आरोपांवर राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी थेट उत्तर दिले आहे. त्यांनी त्यांच्यावर करण्यात आलेले आरोप फेटाळले आहे. ज्या बैठकीचा विरोधक उल्लेख करत आहे, त्या बैठकीचा इतिवृत्तांत त्यांनी सादर केला असून त्यावर प्रधान सचिव स्वाधीन क्षत्रिय यांची स्वाक्षरी असल्याचे त्यांनी सांगितले आहे. हे सर्व आरोप त्यांनी फेटाळले असून जर सरकारला चौकशी करायची असेल तर त्यांनी ती लवकरात लवकर करावी. चौकशीला नाही म्हणण्याची भूमिका आमची नाही जर चौकशी चुकीची निघाली तर तुम्ही कारवाई काय करणार हे देखील जाहीर करावे असे आव्हान शरद पवार यांनी केले.

पत्राचाळ घोटाळ्या प्रकरणी बाजू मांडण्यासाठी राष्ट्रावादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी सत्ताधारी एकनाथ शिंदे गट आणि भाजपवर टीका केली. शरद पवार म्हणाले, त्यावेळी यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये जी बैठक झाली त्यात तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख, कृषी मंत्री म्हणून मी, तसेच विविध मंत्री आणि विभागाचे अधिकारी उपस्थित होते. त्यावेळी बाधित नागरिकांची बैठक घेऊन तडजोड करण्याचा प्रयत्न केला जात होता. याचा अर्थ हा होत नाही की त्यात माझा सहभाग आहे. या बैठकीत काय चर्चा झाली याचा इतिवृत्तांत मी देत आहे. यावर तेव्हाचे प्रधान सचिव स्वाधीन क्षत्रिय यांची स्वाक्षरी आहे. त्यामुळे बेछूट आरोप करण्यापेक्षा लवकरात लवकर चौकशी करावी. आमची चौकशीला नाही म्हणण्याची भूमिका नाही. पण जर चौकशीत काही तथ्य आढळले नाही तर आरोप करणाऱ्यांवर काय कारवाई करणार हे देखील स्पष्ट करावे असे पवार म्हणाले.

ग्रामपंचायत निवडणूक निकालावरूनही शरद पवार यांनी भाजपला फटकारले. राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या सर्वाधिक १७७ जागा निवडून आल्या आहेत. भाजप जो आकडा सांगत आहे तो चुकीचा आहे. जर त्यांना वाटत असेल त्यांच्या जास्त जागा आल्या आहेत तर त्यांनी त्यात आनंदात राहावे असा टोलाही त्यांनी लगावला. शिंदे सरकारने महाविकास आघाडीने केलेलेल्या अनेक योजना बंद केल्या आहेत. त्यातील कोरोना काळातील मृत कुटुंबियांच्या नतेवाईकांना देण्यात येणारे अनुदान बंद करण्यात आले आहे. यामुळे राज्यात शिंदे सरकार विरोधात असंतोष आहे, असेही पवार म्हणाले.

निर्मला सीतारमण यांच्या दौऱ्याबद्दल पवार म्हणाले, सीतारमण यांच्या दौऱ्याचे सुप्रिया सुळे यांनी आधीच स्वागत केले आहे. कोणी कुठे जावे याचे प्रत्तेकाला स्वातंत्र्य आहे. त्यांनी खुशाल बारामतीत यावे. त्यांचे स्वागत आहे. आज भाजप विरोधात देशात वातावरण आहे. यामुळे ते काही मतदार संघावर लक्ष केंद्रित करत आहे. यातूनच हा अट्टहास केला जात आहे. देशात भाजप विरोधात सर्व विरोधकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. असे झाले तर नक्कीच चांगले होईल आणि भाजपला पर्याय उभा होईल असे वाटते असेही पवार म्हणाले.

आव्हाड म्हणाले, विरोधक बेछूटपणे आरोप करत आहेत. शरद पवार हे अनेक बैठकांमध्ये उपस्थित राहतात. आम्ही बेछूटपणे कधी आरोप करत नाहीत. चौकशी करा पण पराचा कावळा करू नका. पत्राचाळ प्रकरणी बैठक झाली पण निर्णय प्रक्रियेत शरद पवार यांचा संबंध नव्हता असेही ते म्हणाले. शरद पवार यांनी १४ जानेवारी २००६ रोजी बैठक घेतली. या बैठकीत सर्व अधिकारी आणि संबंधित लोकं उपस्थित होते असे जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले. पत्राचाळ प्रकरणी शरद पवारांनी बैठक घेतली यात नवल काय असा सवाल करत राज्यातील विविध प्रश्नी अनेक बैठका शरद पवार यांनी घेतल्या होत्या. चर्चा करुन संवाद साधणे आणि मध्य मार्ग काढणे हाच हेतू त्या बैठकीत होता. राज्याचे माजी मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय हे तत्कालीन गृहनिर्माण विभागाचे सचिव होते. त्यांनी या बैठकीचे इतिवृत्त असल्याचे आव्हाड यांनी सांगितले. या बैठकीत कोणताही निर्णय झाला नसल्याचे त्यांनी सांगितले. या बैठकीत सरकार निर्णय घेईल असे मत शरद पवार यांनी व्यक्त केले होते. संवाद साधून मार्ग काढण्याचा प्रयत्न राजकीय नेत्यांचा असतो. तेच या प्रकरणात झाले असल्याचे आव्हाड यांनी म्हटले.

 

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या

विभाग