मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  RajyaSabha: सहाव्या जागेसाठी शिवसेनेचा उमेदवार ठरला? कट्टर शिवसैनिकाला संधी

RajyaSabha: सहाव्या जागेसाठी शिवसेनेचा उमेदवार ठरला? कट्टर शिवसैनिकाला संधी

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
May 24, 2022 01:23 PM IST

राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेनेनं संजय पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आहे.

संजय पवार
संजय पवार

राज्यसभेची (Rajya Sabha Election 2022) सहावी जागा लढण्याची घोषणा शिवसेनेनं (Shivsena) केल्यानंतर हा उमेदवार कोण असेल याची चर्चा गेले काही दिवस सुरू होती. शिवसेनेतील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या जागेसाठी शिवसेनेचे कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख संजय पवार (Sanjay Pawar) यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. लवकरच याबाबत अधिकृत घोषणा होईल. त्यामुळं संभाजीराजे भोसले (Sambhaji Raje Bhosale) राज्यसभेसाठी शिवसेनेत प्रवेश करणार की नाही, हा प्रश्नही निकालात निघाला आहे.

महाराष्ट्रातून राज्यसभेवर निवडून द्यावयाच्या सहा जागांसाठी पुढील महिन्याच्या सुरुवातीला निवडणूक होत आहे. आमदारांच्या संख्याबळानुसार भाजपचे दोन, शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीचा प्रत्येकी एक उमेदवार सहज निवडून जाणार आहे. सहाव्या जागेसाठी खरी चुरस आहे. सहाव्या जागेवर शिवसेनेनं उमेदवार देण्याची घोषणा केली आहे. अपक्ष म्हणून रिंगणात उतरलेले संभाजीराजे भोसले यांनी शिवसेनेकडं पाठिंब्याचं आवाहन केलं होतं. मात्र, संभाजीराजे यांनी शिवसेनेत येऊन उमेदवारी घ्यावी, अशी शिवसेनेची अट होती. त्यावर संभाजीराजे यांनी काहीच उत्तर दिलं नाही. 

या सगळ्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या नेत्यांची काल शिवसेना भवनात महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत राज्यसभेच्या उमेदवाराच्या नावावर चर्चा झाली. शिवसेनेकडून संजय राऊत हे एक उमेदवार आहेत. दुसऱ्या जागेसाठी माजी खासदार चंद्रकांत खैरे, अभिनेत्री उर्मिला मातोंडकर व माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या नावाची चर्चा होती. मात्र, संजय पवार यांनी यात बाजी मारल्याचं समजतं. संजय पवार हे कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख आहेत. काँग्रेस व राष्ट्रवादीच्या बालेकिल्ला असलेल्या कोल्हापूरमध्ये शिवसेनेला प्रभाव निर्माण करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. त्याचंच फळ त्यांना मिळाल्याचं बोललं जात आहे.

संजय पवार म्हणाले, चर्चेतच आनंद!

उमेदवारीच्या प्रश्नावर संजय पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘राज्यसभेसाठी मला उमेदवारी मिळणार आहे हे मला मीडियातूनच समजत आहे. पक्षाकडून अद्याप मला तशी कुठलीही माहिती दिली जाणार नाही. मुख्यमंत्री तथा पक्षप्रमुख त्याबाबत काय तो निर्णय घेतील. संधी मिळाली तर आनंदच आहे. सध्या तरी चर्चेतच आनंद मानतो आहे. मी एक शिवसैनिक आहे. शिवसैनिक म्हणून काम करतच राहणार आहे,’ असं ते म्हणाले.

IPL_Entry_Point

विभाग