मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mukta Tilak : पुण्यातील भाजप आमदार मुक्ता टिळक यांचं कॅन्सरनं निधन

Mukta Tilak : पुण्यातील भाजप आमदार मुक्ता टिळक यांचं कॅन्सरनं निधन

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Dec 22, 2022 06:23 PM IST

Mukta Tilak Death News : भारतीय जनता पक्षाच्या पुण्यातील आमदार मुक्ता टिळक (वय ५७) यांचं आज निधन झालं. त्या कर्करोगानं आजारी होत्या.

Mukta Tilak
Mukta Tilak

Mukta Tilak Passed Away : पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघाच्या भारतीय जनता पक्षाच्या आमदार व पुण्याच्या माजी महापौर मुक्ता टिळक यांचं आज निधन झालं. त्या ५७ वर्षांच्या होत्या. गेल्या काही महिन्यांपासून त्या कर्करोगाशी झुंज देत होत्या. त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, त्यांची प्रकृती उत्तरोत्तर खालावत गेली आणि आज दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास पुण्यातील गॅलेक्सी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

मुक्ता टिळक यांच्या पार्थिवावर उद्या सकाळी ११ वाजता वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. तत्पूर्वी, ९ ते ११ वाजण्याच्या दरम्यान त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी केसरी वाडा येथील राहत्या घरी ठेवण्यात येणार आहे.

मुक्ता टिळक या सुमारे २० वर्षांपासून पुण्याच्या राजकारणात सक्रिय होत्या. फर्ग्युसन महाविद्यालयातून पदवी घेतलेल्या टिळक यांनी मानसशास्त्र विषयातून एमए व त्यानंतर एमबीए केलं होतं. २००२ साली त्यांनी पुणे महापालिकेची निवडणूक पहिल्यांदा लढवली. नगरसेवक म्हणून महापालिकेत त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला होता. त्यांच्या याच कामाच्या बळावर नंतर त्यांना स्थायी समिती सदस्य व महापौर पदही मिळालं. महापालिकेत सर्वाधिक मतांनी निवडून येण्याचा मान त्यांनी मिळवला होता.

महापालिकेतील कामाचा धडाका पाहून पक्षानं २०१९ साली त्यांना पहिल्यांदा विधानसभेत जाण्याची संधी दिली. कसबा विधानसभा मतदारसंघातून त्यांनी विजय मिळवला व विधानसभेत प्रवेश केला. मागील काही महिन्यांपासून त्या आजारी होत्या. त्या आजारपणातून त्या सावरू शकल्या नाहीत.

IPL_Entry_Point

विभाग