मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  धक्कादायक.. जिल्हा रुग्णालयातून महिलेला रात्री बाहेर हाकललं, सकाळी उघड्यावर प्रसूती, यवतमाळमधील घटना
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

धक्कादायक.. जिल्हा रुग्णालयातून महिलेला रात्री बाहेर हाकललं, सकाळी उघड्यावर प्रसूती, यवतमाळमधील घटना

23 October 2022, 18:13 ISTShrikant Ashok Londhe

यवतमाळमधील जिल्हा रुग्णालयातील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका महिलेची रुग्णालयाच्या परिसरात उघड्यावर प्रसूती झाल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे.

यवतमाळ - यवतमाळमधील जिल्हा रुग्णालयातील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका महिलेची रुग्णालयाच्या परिसरात उघड्यावर प्रसूती झाल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे.या घटनेनंतर संपूर्ण जिल्ह्यात खळबळ माजली असून आरोग्य विभागातील धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. पारधी समाजातील महिलेला रुग्णालयातून हाकलून लावल्याची व नंतर तिची उघड्यावर प्रसूती झाल्याची माहिती समोर आली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

यवतमाळमधील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरात ही घटना घडली. रुग्णालयातील स्त्रीरोग विभागातील वार्ड क्रमांक ३ मध्ये दाखल झालेल्या पारधी समाजाच्या महिलेला रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी काल सकाळी हाकलून लावले होते, असा आरोप महिलेच्या नातेवाईकांकडून होत आहे. त्यानंतर रात्रभर महिला रुग्णालयातील परिसरात बसून होती, मात्र रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी तिच्याकडे लक्ष दिले नाही. धक्कादायक म्हणजे रुग्णालय परिसरातच उघड्यावर सकाळी या महिलेची प्रसूती झाली आणि तिनेच स्वत:च्या बाळाची नाळ तोडली. प्रसूतीनंतर ही महिला पतीसह आपल्या गावीही निघून गेली. प्रतीक्षा सचिन पवार (रा. बाळेगाव झोंबाडी ता. नेर) असे महिलेचे नाव आहे.

प्रतीक्षा १०८ रुग्णवाहिकेने रुग्णालयात दाखल झाली होती. तिला वार्ड क्र. ३ मध्ये दाखल करून घेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी तिला ब्लड बँकेतून रक्त आणण्यास सांगितले. महिलाचा पती रक्क घेऊन पहाटेच्या सुमारास रुग्णालयात आला मात्र तोपर्यंत तेथील डॉक्टर व नर्स कोणीही महिलेकडे लक्ष दिले नाही. तिला रक्तही चढवले नाही. उलट याचा जाब विचारल्यानंतर पती-पत्नीला रुग्णालयातून हाकलून लावण्यात आले. त्यानंतर दोघे पती-पत्नी रुग्णालय परीसरातच थांबले होते. दरम्यान आज सकाळी महिलेने रुग्णालय परिसरात उघड्यावरच बाळाला जन्म दिला. यामुळे आरोग्य विभागाची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत.

 

विभाग