मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Rajya Sabha Election: प्रकाश आंबेडकरांना काँग्रेसची उमेदवारी?; 'वंचित' म्हणते…

Rajya Sabha Election: प्रकाश आंबेडकरांना काँग्रेसची उमेदवारी?; 'वंचित' म्हणते…

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
May 20, 2022 10:16 AM IST

वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या राज्यसभेच्या उमेदवारीच्या चर्चेवर पक्षानं भूमिका स्पष्ट केली आहे.

प्रकाश आंबेडकर
प्रकाश आंबेडकर

पुढील महिन्यात होत असलेल्या राज्यसभा निवडणुकीच्या (Rajya Sabha Election 2022) पार्श्वभूमीवर राज्यातून वेगवेगळी नावं चर्चेत येऊ लागली आहेत. संभाजीराजे भोसले (Sambhajiraje Bhosale) यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याची घोषणा केल्यानंतर आता वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांचं नाव पुढं आलं आहे. आंबेडकर यांना काँग्रेसकडून राज्यसभेची उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा आहे. वंचित बहुजन आघाडीनं (Vanchit Bahujan Aghadi) या संदर्भात महत्त्वाचा खुलासा केला आहे.

वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी या संदर्भात एक पत्रक प्रसिद्धीस दिलं आहे. त्यात त्यांनी आंबेडकरांच्या उमेदवारीची चर्चा चुकीची असल्याचं म्हटलं आहे. ‘ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांना काँग्रेसकडून राज्यसभेची उमेदवारी मिळणार असल्याची बातमी प्रसारित करण्यात आली आहे. या बातमीमध्ये काहीही तथ्य नाही. काँग्रेसकडून आम्हाला असा कोणताही प्रस्ताव अद्याप प्राप्त झालेला नाही, असं 'वंचित’नं म्हटलं आहे.

'निवडणुका जवळ आल्या की काँग्रेसमधील एक गट खोट्या बातम्या पेरण्याचं काम करत असतो. अशा खोट्या बातम्या पेरून मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा व वंचित बहुजन आघाडीची बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असंही पत्रकात नमूद करण्यात आलं आहे.

राज्यसभेच्या सहा जागांसाठी जून महिन्यात निवडणूक होणार आहे. आमदारांचं संख्याबळ पाहता भारतीय जनता पक्षाचे दोन, शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रत्येकी एक असे पाच उमेदवार सहज निवडून जाऊ शकतात. सहावा उमेदवार कोण आणि प्रमुख पक्ष आपली अतिरिक्त मते कोणाच्या पारड्यात टाकणार, याविषयी तर्कवितर्क लढवले जात आहेत.

IPL_Entry_Point