मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Assembly Winter Session : ..यामुळे अधिवेशनाच्या पूर्वसंध्येस आयोजित चहापानावर विरोधकांचा बहिष्कार!

Assembly Winter Session : ..यामुळे अधिवेशनाच्या पूर्वसंध्येस आयोजित चहापानावर विरोधकांचा बहिष्कार!

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Dec 18, 2022 05:21 PM IST

Opposition boycotted CM tea party : राज्य सरकार जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यात अपयशी ठरले आहे. तसेच सीमाप्रश्नाबाबतही सरकारने बोटचेपी भूमिका घेतली आहे. महाराष्ट्रातील गावे कर्नाटकबरोबरच अन्य राज्यात सामील होण्याचा प्रस्ताव मंजूर करत आहेत. हे यापूर्वी कधीही झाले नव्हते. असा आरोप अजित पवार यांनी केली आहे.

महाविकास आघाडीची पत्रकार परिषद
महाविकास आघाडीची पत्रकार परिषद

नागपूर - विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन उद्यापासून (सोमवार) नागुपरात सुरू होत आहे. कोरोनानंतर तब्बल दोन वर्षानंतर हिवाळी अधिवेशन नागपुरात होत आहे. या पार्श्वभूमीवर आज (रविवार) महाविकास आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीनंतर महाविकास आघाडीकडून आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आयोजित केलेल्या चहापानावर विरोधी पक्षांकडून बहिष्कार टाकण्यात आल्याचंही त्यांनी यावेळी जाहीर केलं.

अजित पवार म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांसाठी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येस चहापानाचा कार्यक्रम आयोजित केला होता. राज्याच्या विकासाच्या दृष्टीने मनमोकळी अनौपचारिक चर्चा होईल, या हेतूने आम्हाला बोलावलं होतं. मात्र या सरकारच्या काळात ज्या काही अपेक्षा होत्या त्या पूर्ण झाल्या नाहीत. सत्ताधारी पक्षाकडून महापुरुषांबाबत सातत्याने बेताल वक्तव्ये केली जात आहे. राज्यपाल, मंत्री,आमदार सातत्याने छत्रपतींबद्दल वादग्रस्त वक्तव्ये करत आहेत. याचा महाराष्ट्रात संताप व्यक्त केला जात आहे.

सीमाप्रश्नाचा मुद्दा आहे. खरंतर महाराष्ट्राती निर्मिती झाल्यापासून हा प्रश्न कायम आहे. सीमाभागातील गावे महाराष्ट्रात आली पाहिजेत,असं सगळ्यांनाच वाटतं. मात्र हे सरकार आल्यापासून सामोपचाराने हा प्रश्न सुटायच्या ऐवजी महाराष्ट्रातीलच गावे कर्नाटकात तसेच अन्य राज्यात सामील होण्याचे ठाराव करू लागले आहेत. महाराष्ट्रात मागील ६२ वर्षांत अशा प्रकारचा कधीही कोणी प्रयत्न केला नव्हता. याबाबतही या सरकारला अपयश आलं आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री आक्रमकपणे बोलत असताना, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री गप्प आहेत.

महाराष्ट्र हित राखण्यात सरकारला अपयश येत आहे. त्यामुळेच आम्हाला मुख्यमंत्र्यांनी आयोजित केलेल्या चहापान कार्यक्रमास उपस्थित राहणे योग्य वाटत नाही. चहापानाच्या कार्यक्रमास उपस्थित न राहण्याचा निर्णय महाआघाडीच्या नेत्यांनी सर्वानुमते घेतलेला आहे, लोकशाहीच्या प्रथा परंपरेप्रमाणे विधीमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येस चहापान कार्यक्रमास निमंत्रित केल्याबद्दल सरकारचे आभार, असं म्हणत चहापान कार्यक्रमावर बहिष्कार टाकल्याचं अजित पवारांनी जाहीर केलं.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या