मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Supriya Sule: मुंबईच्या वसतिगृहातील तरुणीसोबत घडलेल्या घटनेला सरकार जबाबदार; सुप्रिया सुळे संतापल्या

Supriya Sule: मुंबईच्या वसतिगृहातील तरुणीसोबत घडलेल्या घटनेला सरकार जबाबदार; सुप्रिया सुळे संतापल्या

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Jun 07, 2023 01:11 PM IST

Mumbai Rape and Murder: मुंबईतील चर्चगेट भागातील सावित्रीबाई फुले वसतिगृहमध्ये तरुणीवर बलात्कार करुन त्यानंतर तिची हत्या करण्यात आली.

खासदार सुप्रिया सुळे
खासदार सुप्रिया सुळे (PTI)

Supriya Sule: मुंबईतील चर्चगेट भागातील सावित्रीबाई फुले वसतिगृहमध्ये तरुणीवर बलात्कार आणि हत्या झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी उघडकीस आली आहे. यानंतर वसतिगृहात कार्यरत असलेल्या संशयित सुरक्षा रक्षकाचा मृतदेह रात्री उशीरा चर्नीरोड- ग्रान्डरोड स्थानकांच्या दरम्यान आढळला. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळळी आहे. या घटनेवर राष्ट्रवादी पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

"मुंबईतील मरीन ड्राईव्ह येथील महिला वसतिगृहात एका तरुणीचा मृतदेह आढळला. तिच्यावर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली. ही अतिशय गंभीर आणि दुर्दैवी घटना आहे.अशा घटनांतून महाराष्ट्रात महिला सुरक्षित नाहीत हेच सातत्याने अधोरेखित होत आहे. या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या दुर्दैवी मुलीस भावपूर्ण श्रद्धांजली. राज्य शासनाने या प्रकरणी कसून चौकशी करणे गरजेचे आहे. मुलींच्या वसतिगृहात जाऊन तिची हत्या करण्यापर्यंत गुन्हेगारा़ची मजल जाते ही निश्चितच महाराष्ट्राला शोभणारी बाब नाही", अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली.

पुढे सरकारवर निशाणा साधत सुप्रिया सुळे म्हणाल्या की, "नांदेड जिल्ह्यात एका दलित तरुणास भोसकून मारल्याची घटना ताजी असताना रेणापूर, जि. लातूर येथे एका खासगी सावकाराने एका दलित व्यक्तीला जीवे जाईपर्यंत मारल्याची घटना घडली आहे. एकेकाळी राज्याचे गृहमंत्री स्व. आर. आर. पाटील होते. त्यांच्या काळात गोरगरीबांना नाडणाऱ्या खासगी सावकारांना कठोर शिक्षा केली जात होती.मात्र आज खासगी सावकार गोरगरीबांना पैशासाठी ठार मारत आहेत.तेंव्हा गुन्हेगारांवर कायद्याचा वचक होता. आता मात्र राजरोसपणे गोरगरीबांच्या हत्या होत आहेत ही प्रागतिक विचारांच्या महाराष्ट्राला शोभणारी बाब नाही.या घटनांतील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हायला पाहिजे. या दोन्ही घटनांतील पिडीतांना भावपूर्ण श्रद्धांजली. पिडीतांना न्याय मिळावा ही आमची भूमिका आहे."

IPL_Entry_Point