मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  रिफायनरी नको हाय… मुंबई-गोवा हायवेचं काय?; कोकणवासीय करणार एकजुटीचा आवाज बुलंद

रिफायनरी नको हाय… मुंबई-गोवा हायवेचं काय?; कोकणवासीय करणार एकजुटीचा आवाज बुलंद

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Mar 08, 2023 01:54 PM IST

कोकणातील विविध समस्यांवर चर्चा करण्यासाठी शनिवार, ११ मार्च रोजी मुंबईत कोकणवासीयांचा मेळावा होणार आहे.

Konkan
Konkan

मुंबई-गोवा महामार्ग अनेक वर्षांपासून रखडला असताना नको असलेला रिफायनरी प्रकल्प लादण्याच्या विरोधात एकजुटीचा आवाज बुलंद करण्यासाठी व कोकणच्या विकासाची दिशा ठरविण्यासाठी शनिवार, ११ मार्च रोजी मुंबईत कोकणवीसायांचा मेळावा होणार आहे.

जनता दल सेक्युलर पक्ष आणि कोकण जन विकास समिती यांच्या पुढाकारानं हा मेळावा होणार आहे. दादर पूर्वेकडील मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या प्राध्यापक सुरेंद्र गावस्कर सभागृहात सायंकाळी ५ वाजता हा मेळावा होणार आहे. मुंबई - गोवा रस्त्याचं काम मागील दहा वर्षांपासून रखडलं आहे. निकृष्ट कामामुळं या रस्त्यानं आतापर्यंत हजारो लोकांचा बळी घेतला आहे. रस्त्याच्या कामातील त्रुटी दूर करण्यात याव्यात व हा रस्ता लवकरात लवकर पूर्ण करावा, अशी मागणी यावेळी केली जाणार आहे. ही मागणी पूर्ण होण्यासाठी काय करता येईल याची चर्चा केली जाणार आहे.

राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यापासून पुन्हा एकदा राजापूर येथे पेट्रोलियम रिफायनरी उभारण्याचा विषय चर्चेत आला आहे. कितीही उपाययोजना केल्या तरी पेट्रोलियम रिफायनरी प्रदूषण करतात असा जगभरचा अनुभव आहे. मुंबईतील माहुल येथील रिफायनरी हे याचं उत्तम उदाहरण आहे. त्यामुळं मुंबईत प्रदूषण वाढलं आहे असं खुद्द मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी म्हटलं आहे. कोकणातही हीच परिस्थिती उद्भवू शकते. त्यामुळं या रिफायनरीलाही विरोध आहे. प्रदूषणकारी प्रकल्पांच्या विरोधातील लढा केवळ स्थानिक पातळीपुरता मर्यादित न राहता संपूर्ण कोकणातून त्याविरोधात आवाज उठवण्याचा प्रयत्न कोकण जन विकास समितीच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. कोकणातील कातळाच्या सड्यांवर सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात यावेत, अशी मागणीही यावेळी करण्यात येणार आहे.

कोकणात केवळ स्थानिक पातळीवर दुधाचं पुरेसं उत्पादन करता आलं तरी किमान ५० हजार कुटुंबांना रोजगार मिळेल यासाठी घरोघरी शेततळे सारख्या कल्पनांचा पाठपुरावा करण्यात येणार आहे. यासाठी १०० कार्यकर्त्यांची टीमच कोकण जन विकास समितीच्या माध्यमातून तयार करण्यात येणार आहे.

कोकणवासीयांनी मोठ्या संख्येने या मेळाव्याला उपस्थित रहावे, असे आवाहन जनता दलाचे प्रभाकर नारकर, जगदीश नलावडे, संजय परब, केतन कदम तसेच कोकण जनविकास समितीचे सुरेश रासम, प्रकाश लवेकर आदींनी केले आहे.

IPL_Entry_Point

विभाग