मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  मुंबई-गोवा हायवेवरील परशुराम घाट २४ तास सुरू, पण प्रशासनाने घातल्यात अटी

मुंबई-गोवा हायवेवरील परशुराम घाट २४ तास सुरू, पण प्रशासनाने घातल्यात अटी

Suraj Sadashiv Yadav HT Marathi
Aug 25, 2022 12:41 PM IST

Parshuram Ghat: गणेशोत्सवासाठी कोकणात परतणाऱ्यांची संख्या जास्त असणार आहे. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून अवजड वाहतुकीला २७ ऑगस्टपासून बंदी घातली आहे.

परशुराम घाटातून २४ तास वाहतूक सुरू
परशुराम घाटातून २४ तास वाहतूक सुरू

Parshuram Ghat: मुंबई गोवा महामार्गावर असणारा परशुराम घाट कालपासून सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी २४ तास सुरू ठेवण्यात येणार आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी डॉक्टर बीएन पाटील यांनी आदेश दिले आहेत. तसंच घाट सुरू ठेवताना त्याबाबत प्रशासनाने काही अटी शर्ती लागू केल्या आहेत. घाटातून वाहतूक सुरु ठेवताना ती कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग पेण आणि रत्नागिरी विभागाचे कार्यकारी अभियंता कार्यालय, पोलिस विभाग, परिवहन विभाग यांच्या निरीक्षणाखाली सुरू राहील. तर गणेशोत्सवासाठी कोकणात परतणाऱ्यांची संख्या जास्त असणार आहे. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून येत्या २७ ऑगस्टपासून या मार्गावरील वाळू, रेती व तत्सम गौण खनिजांच्या वाहतुकीला बंदी घालण्यात आली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी घाटत दरड प्रवण क्षेत्रात पुरेशा प्रकाशाची व्यवस्था करण्यास सांगितलं आहे. तसंच ठेकेदार कंपनीकडून घाटात नियमितपणे गस्त ठेवावी. त्या वाहनांचा वाहन क्रमांक आणि गस्त घालणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचे संपर्क क्रमांक घाटात दर्शनी भागात माहितीसाठी लावावेत. दरडप्रवण क्षेत्रात जेसीबी , क्रेन , पोकलेन अशा अत्यावश्यक सेवा २४ तास उपलब्ध ठेवाव्यात असंही सांगण्यात आलं आहे.

घाटात नेमण्यात येणाऱ्या बंदोबस्ताच्या ठिकाणी ठेकेदार कंपनी व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे कर्मचारी उपलब्ध ठेवावेत. त्यांचे संपर्क क्रमांक घाटातील मुख्य नियंत्रण कक्षासह घाटातील दर्शनी भागात माहितीसाठी लावले जावेत. याशिवाय दरडप्रवण क्षेत्राच्या ठिकाणी धोकादर्शक फलक लावा असेही आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

मुंबई , पुणे महामार्गावर दरडप्रवण क्षेत्रात असलेल्या कुंपणाप्रमाणे कुंपण करणे आवश्यक आहे. तसंच घाटामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे आणि संरक्षक भिंती बांधण्याची आवश्यकता असल्याचंही जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. बंदोबस्ताच्या ठिकाणी मंडप , पाणी , प्रकाश व जनरेटरची व्यवस्था करावी. रेड अलर्ट किंवा अतिवृष्टीच्या वेळी घाटातील वाहतूक बंद ठेवण्याचा व पर्यायी मार्गाने वळवण्याबाबतचा निर्णय हा संबंधित उपविभागीय अधिकारी , उपविभागीय पोलीस अधिकारी व राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अभियंत्यांनी संयुक्तपणे घ्यावा असंही आदेशात म्हटलं आहे.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या