मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Borivali Building Collapse: मुंबईत चार मजली इमारत कोसळली; जीवितहानी नाही!

Borivali Building Collapse: मुंबईत चार मजली इमारत कोसळली; जीवितहानी नाही!

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Aug 19, 2022 06:32 PM IST

Mumbai Building Collapse: मुंबईत बोरिवली पश्चिम इथं चार मजली इमारत कोसळल्याची घटना घडली आहे.

Mumbai Building Collapse
Mumbai Building Collapse

राज्यभरात दहीहंडीचा उत्सव जल्लोषात सुरू असताना मुंबईतील बोरिवली इथं चार मजली इमारत कोसळल्याची घटना घडली आहे. इमारत आधीच रिकामी करण्यात आली असल्यानं सुदैवानं या दुर्घटनेत कुठलीही जीवितहानी झालेली नाही.

बोरिवली पश्चिमेकडील साईबाबा नगरात दुपारी साडेबाराच्या सुमारास ही दुर्घटना घडली. गीतांजली सोसायटीतील ही चार मजली इमारत अचानक कोसळली. ही इमारत सुमारे ३५ वर्षे जुनी होती. या इमारतीत १२ ते १५ कुटुंबं राहत होती. धोकादायक घोषित करण्यात आल्यानं इमारत आधीच रिकामी करण्यात आली होती. त्यामुळं अनर्थ टळला आहे. असं असलं तरी कोणी ढिगाऱ्याखाली अडकलं तर नाही ना, याचा शोध अग्निशमन जवानांकडून घेतला जात आहे.

स्थानिक आमदार सुनील राणे यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या माहितीनुसार, या इमारतीच्या पुनर्विकासासाठी बोलणी सुरू होती. आज सकाळीच इमारतीतील लोकांनी घरं खाली केली होती. त्यानंतर ही दुर्घटना घडली. अग्निशमन दलाचं पथक घटनास्थळी पोहोचलं असून इमारतीचा ढिगारा बाजूला करण्याचं काम सुरू आहे. 

IPL_Entry_Point

विभाग