Mumbai rickshaw Accident : मुंबईत इमारतीच्या २३ व्या मजल्यावरून स्लॅबचा भाग अंगावर कोसळून दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. तशाच प्रकारचा अपघात जोगेश्वरी पूर्वमध्ये घडला आहे. बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून लोखंडी रॉड रस्त्यावरून जाणाऱ्या रिक्षावर पडला. यामध्ये मायलेकीचा मृत्यू झाला आहे. महिलेचा जागीच मृत्यू झाला तर मुलगीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.शमाबानो शेख (वय २७) व आयात शेख (वय ९) अशी मृतांची नावे आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना जोगेश्वरी पूर्वेकडील पश्चिम द्रुतगती महामार्गाच्या बाजूस असलेल्या सोनार चाळ परिसरात घडली. मलकानी डेव्हलपर्सकडून येथे बांधकाम सुरू आहे. शनिवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास एक महिला व तिची लहान मुलगी जोगेश्वरी स्टेशन रस्त्यावरून मेघवाडीच्या दिशेने रिक्षाने जात होत्या. त्यावेळी पश्चिम द्रुतगती महामार्गाजवळ एका इमारतीचे बांधकाम सुरू असताना त्या चौथ्या मजल्यावरून लोखंडी रॉड खाली पडला. हा रॉड मायलेकी प्रवास करत असलेल्या रिक्षावर पडला. या अपघातात महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर मुलगी गंभीर जखमी झाली होती. या घटनेमध्ये सुदैवाने रिक्षा चालक सुखरूप वाचला आहे.
अपघातनंतर महिलेला आणि तिच्या मुलीला जवळच्या ट्रामा केयर रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. जिथे महिलेला मृत घोषित करण्यात आले. तर मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. घटनेमुळे स्थानिक लोकांनी बांधकाम साईटवर होत असलेल्या बेजबाबदारपणाबद्दल संताप व्यक्त केला आहे.
संबंधित बातम्या