मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  ‘अदानी’ महाघोटाळ्याविरोधात १३ मार्चला काँग्रेसचा मोर्चा व ‘राजभवन घेराव’

‘अदानी’ महाघोटाळ्याविरोधात १३ मार्चला काँग्रेसचा मोर्चा व ‘राजभवन घेराव’

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Mar 11, 2023 07:42 PM IST

Congress Protest march against Adani scam : अदानी घोटाळ्याप्रकरणी काँग्रेस १३ मार्चला मुंबईत धडक मोर्चा काढून राजभवनला घेरावघालणार आहे,अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.

नाना पटोले
नाना पटोले

मुंबई - मोदी सरकारची उद्योगपती गौतम अदानींवर विशेष मेहरबानी असून यामुळेच स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) एलआयसीमधील (LIC) कोट्यवधी लोकांचा पैसा मनमानी पद्धतीने अदानींच्या कंपन्यात गुंतवला. आता अदानी समूहातील आर्थिक घोटाळा उघड झाल्याने जनतेचा कष्टाचा पैसा सुरक्षित राहिला नाही. अदानी महाघोटाळ्याप्रश्नी मोदी सरकार मूग मिळून गप्प बसले आहे, जनतेच्या हितासाठी जाब विचारत  काँग्रेस  १३  मार्चला  मुंबईत धडक मोर्चा काढून राजभवनला घेराव घालणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.

नाना पटोले म्हणाले की, मोदींच्या हुकूमशाही कारभामुळे देश आर्थिक संकटातून जात आहे, जनतेचा पैसा अदानीच्या घशात घालून जनतेला आर्थिक संकटात घातले आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अदानीचा फुगा लवकर फुटेल, अशी भीती व्यक्त केली होती मात्र मोदी सरकार वेळीच सावध झाले नाही. विरोधी पक्षांचे मोदी ऐकतच नाहीत. अदानीचा फुगा फुटला आणि जनतेचा पैसा धोक्यात आला, हा पैसा बुडेल अशी भीती वाटते. 

काँग्रेस पक्षाने संसदेत अदानी महाघोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी केली पण मोदी सरकारने या घोटाळ्यावर एक शब्दही काढला नाही. मोदी सरकार भ्रष्ट अदानीला पाठीशी घालत आहे. राज्यात दोन दिवसात माजी मंत्री हसन मुश्रीफ व सदानंद कदम यांच्यावर ईडीने कारवाईने केली आहे. मुश्रीफ यांच्यावर तर ईडी तिसऱ्यांदा कारवाई करत आहे परंतु याच ईडीला भाजपाचे भ्रष्ट नेते दिसत नाहीत. विरोधी पक्षांच्या मागे ईडी, सीबीआय व आयकर विभागाचा चौकशीचा ससेमिरा लावणारे मोदी सरकार अदानी घोटाळ्याची चौकशी का करत नाही? भाजपा सरकार अदानीच्या महाघोटाळ्यावर गप्प बसले असले तरी जनतेच्या हितासाठी काँग्रेसने आवाज उठवला आहे, त्याचाच एक भाग म्हणून राजभवनवर धडक मोर्चा काढला जाणार आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली सोमवार दिनांक १३ मार्च रोजी दुपारी  तीन   वाजता गिरगाव चौपाटी ते राजभवन असा मोर्चा काढला जाणार आहे व राजभवनला घेराव घातला जाईल. या मोर्चात विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, प्रदेश कार्याध्यक्ष माजी मंत्री नसीम खान, चंद्रकांत हंडोरे, बसवराज पाटील, आ. प्रणिती शिंदे, आ. कुणाल पाटील, यांच्यासहित काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री, आमदार, खासदार, प्रमुख पदाधिकारी, सर्व सेल व फ्रंटलचे अध्यक्ष, तसेच काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.

IPL_Entry_Point