मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  छत्र्या, रेनकोट तयार ठेवा… ‘या’ तारखेपर्यंत मान्सून महाराष्ट्रात दाखल होणार

छत्र्या, रेनकोट तयार ठेवा… ‘या’ तारखेपर्यंत मान्सून महाराष्ट्रात दाखल होणार

Suraj Sadashiv Yadav HT Marathi
May 21, 2022 11:27 AM IST

महाराष्ट्रात गेल्या दोन दिवसांपासून अनेक भागात मुसळधार पाऊस सुरु असून यामुळे पीकांचे मोठे नुकसान झाले आहे.

कोकणात मान्सून ५ जून पर्यंत दाखल होणार
कोकणात मान्सून ५ जून पर्यंत दाखल होणार (फोटो - पीटीआय)

मान्सून अरबी समुद्रात आणि श्रीलंकेच्या किनारपट्टीजवळ काही अंतरावर दाखल झाला आहे. यंदा वेळेआधीच मान्सूनचे वारे सक्रीय झाले आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसात मान्सून केरळमध्ये पोहचेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. तर महाराष्ट्रात कोकण किनारपट्टीवर मान्सून ५ जूनपर्यंत पोहोचेल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

बंगालच्या उपसागरासह अरबी समुद्रातूनही किनारपट्टीच्या दिशेने बाष्पयुक्त वारे वाहत आहेत. याचाच परिणाम म्हणजे पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मराठवाड्यात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे. केरळमध्ये पावसाला जोरदार सुरुवात झाली असून अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. केरळवर मोठे ढग असून यामुळे अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्रात ५ जूनपासून मान्सून सुरु होईल असा अंदाज वर्तवला आहे. त्यानंतर १२ ते १५ जून या कालावधीत राज्यभरात मान्सूनची हजेरी लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्रात दरवर्षीप्रमाणेच मान्सून दाखल होईल असं भारतीय हवामान विभागाने दिली आहे.

गेल्या २४ तासात उमरग्यात ७५ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली. तर कोल्हापुरात गारगोटी 14,आजरा 19, शिरोळ 21, गगनबावडा 5, कसबे डिग्रज 25, तर शिरूर अनंतपाळ २५,  माढा 1.3, मोहोळ 7 मिलिमीटर पाऊस पडला. याशिवाय कोकणात हलक्या सरी झाल्या.

महाराष्ट्रात गेल्या दोन दिवसांपासून अनेक भागात मुसळधार पाऊस सुरु असून यामुळे पीकांचे मोठे नुकसान झाले आहे. केळी, द्राक्ष, डाळिंबांच्या बागांना फटका बसला आहे. पंढरपूरमध्ये वादळी वाऱ्यामुळे द्राक्ष, बेदाण्यांचे शेड उद्ध्वस्त झाले आहे.

IPL_Entry_Point