मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Imtiyaz Jalil: औरंगाबादेत खासदार इम्तियाज जलील यांच्यावर पैशांची उधळण; विरोधकांची टीका

Imtiyaz Jalil: औरंगाबादेत खासदार इम्तियाज जलील यांच्यावर पैशांची उधळण; विरोधकांची टीका

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Nov 19, 2022 10:08 AM IST

MP Imtiyaz Jalil : औरंगाबादेतील आमखास मैदानावर कव्वालीच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी खासदार इम्तियाज जलील यांच्या समर्थकांनी त्यांच्यावर नोटांची उधळण केली.

Imtiaz Jaleel
Imtiaz Jaleel

Qawwali Program In Aurangabad : एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्यावर औरंगाबादेतील कव्वालीच्या कार्यक्रमात नोटांची उधळण करण्यात आली आहे. मराठवाड्यात यंदा अतिवृष्टीमुळं असंख्य शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालेलं असताना खासदार इम्तियाज जलीलांवर अशा प्रकारे पैशांची उधळपट्टी करण्यात आल्यानं नाराजी व्यक्त केली जात आहे. दरम्यान आता या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानं खासदार जलील यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

खासदार इम्तियाज जलील यांनी औरंगाबाद शहरात आयजे फेस्टिव्हलचं (इम्तियाज जलील) आयोजन केलं आहे. यात क्रिकेट स्पर्धांसह सांस्कृतिक कार्यक्रमांचंही आयोजन करण्यात आलं आहे. या फेस्टिव्हलला अनेक राजकीय नेत्यांसह प्रशासकीय अधिकारी भेट देत आहे. रात्री आमखास मैदानावर कव्वालीच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यासाठी खासदार जलील व्यासपीठावर पोहचताच समर्थकांनी त्यांच्यावर पैशांचा अक्षरशः पाऊस पाडला. त्याचा व्हिडिओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

मराठवाड्यात यंदा अतिवृष्टीमुळं अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे. परंतु या सर्व काळात खासदार इम्तियाज जलील यांनी एकाही शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली नव्हती. त्यामुळं संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला मदत न करता पैशांची उधळपट्टी केल्यानं शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.

जलीलांवर दुसऱ्यांदा पैशांची उधळण

खासदार इम्तियाज जलील यांच्यावर पैशांची उधळण होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी एमआयएम पक्षाच्या एका नेत्याच्या भाचीच्या लग्नात जेव्हा जलील पोहचले होते तेव्हाही त्यांच्यावर नोटांची उधळण करण्यात आली होती. त्यानंतर आता अतिवृष्टीमुळं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं असताना खासदार जलील यांच्यावर नोटा उधळल्या गेल्यानं संताप व्यक्त केला जातोय.

IPL_Entry_Point

विभाग