मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  पुण्याच्या सिंहगड रस्त्यावर दिवसाढवळ्या गोळीबार, बांधकाम व्यावसायिकाचे धक्कादायक कृत्य, एकजण जखमी

पुण्याच्या सिंहगड रस्त्यावर दिवसाढवळ्या गोळीबार, बांधकाम व्यावसायिकाचे धक्कादायक कृत्य, एकजण जखमी

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Jan 24, 2023 03:26 PM IST

Pune Crime: पुण्यातील सिंहगड रस्त्यावर एका बांधकाम व्यावसायिकाने गोळीबार केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत एकजण जखमी झाला असून पोलिसांनी बांधकाम व्यावसायिकाला ताब्यात घेतले आहे.

Pune Firing
Pune Firing

Pune Firing: पुण्यात गुन्हेगारीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. पुण्यात दररोज हत्या, घरफोडी, चोरी, आणि हाणामारीच्या घटना घडत आहेत. अशा घटनांमुळे पुणे शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. यातच पुण्याच्या सिंहगड रस्त्यावर दिवसाढवळ्या गोळीबार करण्यात आल्याची घटना समोर आलीय. व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर चॅटिंगवरून झालेल्या वादातून बांधकाम व्यावसायिकाने गोळीबार केला. यामध्ये एकजण जखमी झाला असून पोलिसांनी बांधकाम व्यावसायिकाला ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रमेश राठोड (रा. वारजे माळवाडी, पुणे) असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर, संतोष पवार असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. संतोष पवार, देवा राठोड आणि रमेश राठोड यांच्यासह इतर काहीजण सिंहगड रस्ता परिसरातील सनसिटी रोडवरील योगीराज ऑटो सेंटरमध्ये बोलत थांबले होते. त्यावेळी संतोष पवार आणि देवा राठोड यांच्यात व्हॉट्सअॅप चॅटिंगवरून बाचाबाची झाली. त्यावेळी रमेश राठोडने वाद मिटवण्यासाठी मध्यस्ती केली. पण संतोष पवारने त्याच्या कमरेला असलेले पिस्तुल काढून रमेश राठोडच्या दिशेने गोळीबार केला. या गोळीबारात रमेश राठोडच्या पायाला दुखापत झाली.त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती पुणे पोलिसांकडून मिळत आहे.

या घटनेची माहिती मिळताच सिंहगड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संतोष पवारला ताब्यात घेतले. संतोष यांच्याकडे असलेले पिस्तुल परवानाधारक असून त्याच्या संरक्षणासाठी एक पोलिस कर्मचारी देखील आहे. याप्रकरणी सिंहगड पोलीस अधिक तपास करीत आहेत.

IPL_Entry_Point

विभाग