मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Sanjay Rathod: अखेर एकनाथ शिंदे यांनी संजय राठोड यांना मंत्री केलेच!

Sanjay Rathod: अखेर एकनाथ शिंदे यांनी संजय राठोड यांना मंत्री केलेच!

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Aug 09, 2022 12:33 PM IST

Sanjay Rathod takes oath as Minister: महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंत्री असलेले व आरोपांमुळं राजीनामा द्यावा लागलेले संजय राठोड पुन्हा मंत्री झाले आहेत.

Sanjay Rathod
Sanjay Rathod

Maharashtra Cabinet Expansion: एका तरुणीला आत्महत्येला प्रवृत्त केल्याचे आरोप झाल्यानंतर मंत्रिपद गमवावे लागलेले शिवसेनेचे बंडखोर आमदार संजय राठोड हे पुन्हा मंत्री झाले आहेत. नव्या सरकारमध्ये शिंदे गटाच्या कोट्यातून त्यांची मंत्रिपदी वर्णी लागली आहे. राठोड यांना मंत्रीपद मिळेल, असं संकेत शिंदे यांनी आधीच दिले होते.

यवतमाळ जिल्हा हे कार्यक्षेत्र असलेले संजय दुलीचंद राठोड हे बंजारा समाजातील वजनदार नेते आहेत. ३० जून १९७१ रोजी यवतमाळ इथं त्यांचा जन्म झाला. ते वाणिज्य शाखेचे पदवीधर असून बॅचलर इन फिजिकल एज्युकेशनचा (B. P. ED) अभ्यासक्रमही पूर्ण केला आहे. शिंदे गटातील तरुण आमदारांपैकी ते एक आहेत. दिग्रज विधानसभा मतदारसंघाचे ते आमदार आहेत. २००४ पासून ते सलग चार वेळा विधानसभेवर निवडून येत आहेत. आदिवासी, बंजारा समाजात त्यांचं मोठं काम आहे.

वयाच्या विशीत असताना १९९१ मध्ये ते शिवसेनेत सक्रिय झाले. धडाकेबाज कार्यशैलीमुळं अल्पावधीतच त्यांनी पक्ष नेतृत्वाचं लक्ष वेधून घेतलं. १९९७ साली त्यांची यवतमाळ जिल्हा प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर त्यांचा लोकसंपर्क वाढत गेला. शिवसेनेच्या सर्व आंदोलनात त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. निराधारांना अनुदान, पाणी प्रश्न व शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी अनेक धरणं आंदोलनं केली आहेत. विदर्भस्तरीय आदिवासी परिषद, बंजारा समाज मेळावा व सरपंच परिषदेचं आयोजन करण्यात त्यांचा पुढाकार असतो. 

फडणवीस सरकारच्या काळात ते महसूल खात्याचे राज्यमंत्री होते. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात आलेल्या महाविकास आघाडी सरकारमध्ये राठोड त्यांना कॅबिनेट मंत्रीपदी बढती मिळाली होती. त्यानं वन खातं देण्यात आलं होतं. मात्र, पुण्यात एका तरुणीनं केलेल्या आत्महत्येच्या प्रकरणात त्यांचं नाव आलं. विरोधकांनी हा मुद्दा उचलून धरत राज्यात रान पेटवलं. त्यामुळं त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. काही महिन्यांपूर्वीच त्यांना पोलिसांकडून क्लीन चिट देण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा मंत्रिमंडळात समावेश व्हावा म्हणून ते प्रयत्नशील होते. खुद्द एकनाथ शिंदे यांनी राठोड यांच्यासाठी उद्धव ठाकरे यांच्याकडं रदबदली केली होती, असं बोललं जातं. मात्र, त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात स्थान मिळालं नाही. त्यामुळं ते नाराज होते.

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर पहिल्या दिवशी सुरतला गेलेल्या आमदारांमध्ये त्यांचा समावेश नव्हता. दुसऱ्या दिवशी उद्धव ठाकरे यांनी राठोड यांनाच शिंदे यांच्याशी चर्चा करण्यासाठी पाठवलं. मात्र, ते स्वत:च शिंदे यांना जाऊन मिळाले. त्याचं फळ त्यांना मिळाल्याचं बोललं जात आहे.

IPL_Entry_Point