मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  गुत्तेदाराला मिळालेलं कंत्राट जावयाला दिलं? शिंदे सरकारच्या ‘या’ मंत्र्यावर भ्रष्टाचाराचे आरोप

गुत्तेदाराला मिळालेलं कंत्राट जावयाला दिलं? शिंदे सरकारच्या ‘या’ मंत्र्यावर भ्रष्टाचाराचे आरोप

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Sep 15, 2022 02:55 PM IST

Irrigation Scam : राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्यांदाच एका मंत्र्यावर थेट भ्रष्टाचाराचे आरोप लागल्यानं खळबळ उडाली आहे.

Irrigation Scam In Aurangabad
Irrigation Scam In Aurangabad (HT)

Irrigation Scam In Aurangabad : वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प राज्याबाहेर गेल्याचं प्रकरण गाजत असतानाच आता विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शिंदे सरकारमधील कॅबिनेट मंत्री संदीपान भुमरे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानं खळबळ उडाली आहे. राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर आता पहिल्यांदात एका मंत्र्यावर घोटाळ्याचे आरोप लागल्यानं राजकीय वादंग पेटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मंत्री संदीपान भुमरे यांनी औरंगाबाद जिल्ह्यातील ब्राम्हगव्हाण उपसा सिंचन योजनेचं कंत्राट जावयाला मिळवून दिल्याचा आरोप करत या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, अशी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे.

याबाबत माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, ब्राम्हगव्हाण उपसा सिंचन योजनेचं कंत्राट ज्या गुत्तेदाराला मिळालं होतं, ते त्याच्याकडून काढून मंत्री संदीपान भुमरे यांनी आपल्या जावयाला मिळवून दिलं. तीन दिवसांपूर्वी पैठणच्या सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्या विकासकामांची घोषणा केली होती, त्या कामांची सुरुवात मविआ सरकारच्या काळात झाली होती. त्यातल्या ब्राम्हगव्हाण उपसा सिंचन योजनेची प्रशासकीय मान्यतादेखील मविआ सरकारच्याच काळात मिळाली होती, मात्र या योजनेचं कंत्राट मंत्री भुमरेंच्या जावयाला मिळालंच कसं?, असा सवाल करत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

ज्या गुत्तेदाराला काम मिळालं होतं, त्यांच्याकडून भुमरेंच्या जावयांनी रीतसर खरेदीखत केलेलं आहे. परंतु अशा प्रकारे खरेदीखत करता येत नाही, हा संपूर्ण प्रकार गंभीर असून राज्य सरकारनं या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी केली आहे.

IPL_Entry_Point