मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  प्रवाशांनो लक्ष द्या.. शनिवारी रात्री व रविवारी हार्बर व मध्य मार्गावर मेगाब्लॉक

प्रवाशांनो लक्ष द्या.. शनिवारी रात्री व रविवारी हार्बर व मध्य मार्गावर मेगाब्लॉक

Shrikant Ashok Londhe HT Marathi
May 20, 2022 10:38 PM IST

रविवारी म्हणजे २२ मे रोजी घराबाहेर पडणाऱ्या मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी आहे. देखभालीच्या आणि काही तांत्रिक कामांसाठी २१ मे रात्रीपासून रेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गांवर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. रेल्वेने पत्रक काढून या मेगा ब्लॉकबाबतची माहिती दिली आहे.

रविवारी हार्बर व मध्य मार्गावर मेगाब्लॉक
रविवारी हार्बर व मध्य मार्गावर मेगाब्लॉक

मुंबई – शनिवारी रात्री रेल्वेकडून दुरुस्तीच्या कामांसाठी मेगाब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे रविवारी असणाऱ्या मेगाब्लॉकचे वेळापत्रकही रेल्वे प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे प्रवाशांनी हे वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडावे व आपल्या प्रवासाचे नियोजन करावे. २१/२२.५.२०२२ रोजी (शनिवार/रविवार मध्यरात्री) मुख्य मार्गावर रात्रीचा मेगा ब्लॉक आणि हार्बर मार्गावर रविवार २२.५.२०२२ रोजी मेगाब्लॉक असणार आहे, असे रेल्वेने जाहीर केले आहे. 

कसा असेल मेगाब्लॉक -

मध्य रेल्वे, मुंबई विभाग रविवार दि. २२.५.२०२२ रोजी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी आपल्या उपनगरीय विभागांत मेगा ब्लॉक चालवणार आहे. दि. २१/२२.५.२०२२ रोजी रात्री ११.३० ते पहाटे ४.३० वाजेपर्यंत भायखळा- माटुंगा अप जलद मार्गावर आणि सकाळी ००.४० ते ५.४० पर्यंत भायखळा- माटुंगा दरम्यान डाउन जलद मार्गावर.

सकाळी ५.२० वाजताची छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटणारी डाउन जलद सेवा भायखळा आणि माटुंगा स्थानकांदरम्यान डाउन धीम्या मार्गावर वळवण्यात येऊन आपल्या वेळापत्रकानुसार थांब्यांवर थांबेल आणि गंतव्य स्थानकावर १० मिनिटे उशिराने पोहोचेल.

दि. २१.५.२०२२ रोजी रात्री १०.५८ ते रात्री ११.१५ पर्यंत ठाण्याहून सुटणारी अप जलद सेवा माटुंगा आणि भायखळा स्थानकांदरम्यान अप धिम्या मार्गावर वळवली जाईल, या गाड्या नियोजित थांब्यांनुसार थांबतील आणि गंतव्यस्थानावर १० मिनिटे उशिराने पोहोचतील.

 पनवेल- वाशी अप आणि डाउन हार्बर मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ४.०५ पर्यंत (ठाणे-वाशी/नेरुळ आणि बेलापूर/नेरुळ-खारकोपर सेवा प्रभावित राहणार नाहीत) पनवेल येथून सकाळी १०.३३ ते दुपारी ३.४९ वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी ९.४५ ते दुपारी ३.१२ या वेळेत पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.

पनवेल येथून सकाळी ११.०२ ते दुपारी ३.५३ वाजेपर्यंत सुटून  ठाण्याकडे जाणारी अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि पनवेल येथून सकाळी १०.०१ ते दुपारी ३.२० वाजेपर्यंत सुटून ठाण्याकडे जाणाऱ्या ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.

ब्लॉक कालावधीत खारकोपर आणि बेलापूर/नेरुळ दरम्यानच्या उपनगरीय रेल्वे सेवा वेळापत्रकानुसार धावतील. ब्लॉक कालावधीत ठाणे- वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर लाईन सेवा उपलब्ध असेल. ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई- वाशी भागात विशेष उपनगरीय गाड्या धावतील. असे पत्रक रेल्वेने काढले आहे.

IPL_Entry_Point