मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  JJ Hospital Mumbai : राज्य सरकारचा मोठा निर्णय, तात्याराव लहाने-रागिनी पारेख यांच्यासह सर्व डॉक्टरांचे राजीनामे मंजूर

JJ Hospital Mumbai : राज्य सरकारचा मोठा निर्णय, तात्याराव लहाने-रागिनी पारेख यांच्यासह सर्व डॉक्टरांचे राजीनामे मंजूर

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Jun 03, 2023 10:52 PM IST

Tatyarao Lahane Resignation : डॉक्टर तात्याराव लहाने यांच्या बदलीसाठी निवासी डॉक्टरांच्या संघटनेने आंदोलन सुरू केलं होतं. त्यानंतर आता राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

Tatyarao Lahane Resignation
Tatyarao Lahane Resignation (HT)

Tatyarao Lahane and Ragini Parekh Resignation : मुंबईतील जेजे रुग्णालयातील मानद प्राध्यापक डॉक्टर तात्याराव लहाने आणि डॉक्टर रागिनी पारेख यांचा राजीनामा अखेर राज्य सरकारकडून मंजूर करण्यात आला आहे. त्यांच्या जागेवर नवीन डॉक्टरांची नियुक्ती करण्याचे आदेश सरकारने जारी केले आहे. तात्याराव लहाने आणि रागिनी पारेख यांच्या बदलीसाठी जेजे रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी आंदोलन सुरू केलं होतं. त्याला देशभरातील डॉक्टरांच्या संघटनांनी पाठिंबा दिला होता. त्यानंतर डॉक्टर तात्याराव लहाने आणि रागिनी पारेख यांनी मुदतपूर्व सेवानिवृत्तीसाठी अर्ज करत राजीनामा दिला होता. अखेर आज आरोग्य विभागाने दोन्ही डॉक्टरांसहित अन्य डॉक्टरांचे राजीनामे मंजूर करत त्यांच्या जागी नव्या डॉक्टरांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्य सरकारने राजीनामा मंजूर केल्यानंतर डॉक्टर तात्याराव लहाने माध्यमांशी बोलताना म्हणाले की, मी ३१ मे रोजी पदाचा राजीनामा दिला होता. आमच्यावर जे आरोप करण्यात आले, त्यावर आमची बाजू जाणून घेण्यात आली नाही. कुणाचंही मत विचारात न घेता केवळ निवासी डॉक्टरांच्या प्रतिक्रियांवर एकतर्फी अहवाल तयार करण्यात आला. निवासी डॉक्टरांनी केलेले सर्व आरोप खोटे होते, त्यामुळं माझ्यासहित अन्य आठ डॉक्टरांनी पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला होता, असा आरोप डॉक्टर तात्याराव लहाने यांनी रुग्णालय प्रशासनावर केला आहे. तसेच निवृत्त झाल्यानंतरही सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल लहाने यांनी प्रशासनाचे आभार मानले आहे. राजीनामा दिल्यानंतर कोणत्याही राजकीय व्यक्तीशी अथवा सरकारमधील नेत्यांची बोलणी झाली नसल्याचा दावाही तात्याराव लहाने यांनी केला आहे.

डॉक्टर तात्याराव लहाने हे जेजे रुग्णालयात मनमानी पद्धतीने कारभार करत असल्याचा आरोप निवासी डॉक्टरांच्या संघटनांनी केला होता. त्यानंतर निवासी डॉक्टरांची संघटना आणि मार्डने डॉक्टर लहाने आणि पारेख यांच्याविरोधात आंदोलन सुरू केलं होतं. परंतु डॉक्टरांच्या संघटनांनी केलेल आरोप तात्याराव लहाने यांनी फेटाळून लावले होते. त्यानंतर तात्याराव लहाने, रागिनी पारेख यांच्यासहित आठ डॉक्टरांनी मुदतपूर्व सेवानिवृ्त्तीसाठी अर्ज केला होता. राज्य सरकारने सर्व डॉक्टरांचे राजीनामे मंजूर करत नव्या डॉक्टरांच्या नियुक्त्या करण्याचे आदेश दिले आहे.

IPL_Entry_Point