Odisha Train Accident : ओडिशातील रेल्वे अपघाताच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश, रेल्वेमंत्री राजीनामा देण्याच्या तयारीत
Odisha Train Accident : ओडिशातील रेल्वे अपघातात आतापर्यंत तब्बल २६३ लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर आता या घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहे.
Coromandel Express Train Accident Odisha : ओडिशातील बालासोरमध्ये झालेल्या तीन रेल्वेंच्या अपघातातील मृत्यूंची संख्या २६३ वर पोहचली आहे. हजारावर लोक जखमी असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक आणि रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांनी घटनास्थळाची पाहणी करत अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहे. संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील अपघातस्थळाची पाहणी करणार आहे. परंतु रेल्वेमंत्र्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना अनेक प्रश्नांवर चुप्पी साधल्यामुळं ते नैतिकतेच्या आधारावर मंत्रिपदाचा राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. भारतीय लष्कर, अग्निशमन दल आणि स्थानिक पोलिसांकडून मदत व बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे.
ट्रेंडिंग न्यूज
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज सकाळी बालासोरचा दौरा करत अपघातग्रस्त ठिकाणची पाहणी केली आहे. यावेळी रेल्वेचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नेहमी झीरो अपघात पॉलिसीवर भाष्य करणारे रेल्वेमंत्री यावेळी मात्र चुप्पी साधताना दिसून आले. पत्रकारांनी राजीनाम्याविषयी प्रश्न केला असता आश्विनी बैष्णव यांनी काहीही भाष्य न करता पत्रकार परिषद संपवली. त्यामुळं आता रेल्वे अपघातामुळे ते राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर आश्विनी वैष्णव यांच्या राजीनाम्याबाबत निर्णय घेणार असल्याची माहिती आहे.
शुक्रवारी रात्री उशिरा कोरोमंडल एक्स्प्रेस आणि बेंगळुरू-हावडा सुपरफास्ट एक्सप्रेस यांच्यात भीषण अपघात झाला होता. याशिवाय या दोन्ही रेल्वेंना एक मालगाडी देखील येऊन धडकली होती. तीन रेल्वेंच्या अपघातात आतापर्यंत २६३ लोकांचा मृत्यू झाला असून १ हजार लोक जखमी झाले आहे. जखमींचा आकडा मोठा असल्यामुळं मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. तीन रेल्वेंचा अपघात झाल्यामुळं सोशल मीडियावर अनेकांनी रेल्वेमंत्री आश्विनी बैष्णव यांच्या राजीनाम्याची मागणी करत मोदी सरकारवर टीका केली आहे.