मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  ईडीला पुन्हा धक्का; राऊतांच्या जामीनाविरोधातील याचिकेवर सुनावणीस उच्च न्यायालयाचा नकार

ईडीला पुन्हा धक्का; राऊतांच्या जामीनाविरोधातील याचिकेवर सुनावणीस उच्च न्यायालयाचा नकार

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Nov 25, 2022 10:50 PM IST

संजय राऊत यांचा जामीन रद्द करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणी घेण्यास उच्च न्यायालयाने नकार दिल्याने ईडीला धक्का बसला आहे.

संजय राऊत
संजय राऊत

पत्राचाळ घोटाळ्या प्रकरणी खासदार संजय राऊत यांना मंजूर झालेला जामीन रद्द करावा, अशी मागणी करणारी सक्तवसुली संचलनालयाची (ईडी) याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. याचिकेवर सुनावणी घेण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. त्यामुळे या याचिकेवर आता पुढील आठवड्यात सुनावणी होण्याची शक्यता आहे. 

पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणात संजय राऊत यांना मंजूर झालेल्या जामीनाला विरोध करणाऱ्या ईडीनं दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी घेण्यास न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांनी शुक्रवारी नकार दिला. त्यामुळे आता अन्य न्यायमूर्तींकडे ईडीला आपली याचिका सादर करावी लागणार आहे. पुढील आठवड्यात न्यायमूर्ती अनुजा प्रभू देसाई यांच्यासमोर या याचिकेवर सुनावणी होण्याची शक्यता आहे. 

संजय राऊत यांना ९ नोव्हेंबर रोजी जामीन मंजूर झाला होता. यावेळी संजय राऊतांना या प्रकरणात गोवण्यात आल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले होते. त्यानंतर राऊतांचा जामीन रद्द करावा, अशी मागणी करणारी सुधारित याचिका ईडीतर्फे उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. ”संजय राऊत आणि त्यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांना जामीन मंजूर करताना विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एम. जी. देशपांडे यांनी बरीच निरीक्षणे नोंदवली आहेत. यातील काही निरीक्षणे आणि टिप्पण्या अनावश्यक आणि अधिकार क्षेत्राच्या बाहेर करण्यात आल्या आहेत. त्यामुळे त्या आदेशातून काढून टाकाव्यात व नवा आदेश देण्यात यावा, अशी मागणी ईडीकडून करण्यात आली होती.

IPL_Entry_Point