मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Sharad Pawar: गुजरातच्या निकालानंतर शरद पवार यांचं मोठं राजकीय विधान; म्हणाले, भाजप जिंकला तरी…

Sharad Pawar: गुजरातच्या निकालानंतर शरद पवार यांचं मोठं राजकीय विधान; म्हणाले, भाजप जिंकला तरी…

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Dec 08, 2022 03:41 PM IST

Sharad Pawar on Gujarat Election results: गुजरात विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शरद पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

Sharad Pawar
Sharad Pawar

Sharad Pawar on Gujarat Election results: गुजरात विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून भारतीय जनता पक्ष पुन्हा एकदा तिथं सत्तेवर येणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. भाजपला या निवडणुकीत आजवरचं सर्वात मोठं यश मिळालं आहे. त्यामुळं भाजपच्या गोटात कमालीचं आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या निकालावर प्रतिक्रिया देताना सूचक भाष्य केलं आहे. 

नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक आज शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत झाली. त्यानंतर पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना पवार यांनी ताज्या निवडणूक निकालांवर भाष्य केलं. 'गुजरातची निवडणूक एकतर्फी होईल याबद्दल कुणाच्या मनात शंका नव्हती. देशाची संपूर्ण सत्ता तिथं वापरली गेली. एकाच राज्याला सोयीचे अनेक निर्णय घेतले गेले. अनेक प्रकल्प तिथंच येतील, याची काळजी घेतली गेली. त्याचा परिणाम निकालावर होणार हे अपेक्षित होतं, असं ते म्हणाले.

शरद पवार यांनी यावेळी आणखी एक महत्त्वाचं निरीक्षण नोंदवलं. ते म्हणाले, 'गुजरात निवडणुकीचा निकाल भाजपच्या बाजूनं लागला याचा अर्थ लोकमत एकाच बाजूला आहे, असं नाही. दिल्ली महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं तिथल्या जनतेनं हे दाखवून दिलं आहे. मागची १५ वर्षे दिल्ली महापालिकेत भाजपची सत्ता होती, ती आता राहिलेली नाहीत. अशी अनेक उदाहरणं आहेत. हिमाचल प्रदेशच्या निवडणुकीतही हेच चित्र आहे. हिमाचलमध्ये भाजपचं राज्य होतं. आज काँग्रेसनं तिथं सत्ता स्थापण्याइतपत जागा मिळवल्या आहेत. भाजपची सत्ता गेली आहे. दिल्ली, पंजाब आणि आता हिमाचलही गेलं. याचा अर्थ हळूहळू बदल व्हायला लागला आहे, असा आशावाद शरद पवार यांनी व्यक्त केला.

राजकारणात पोकळी असते. गुजरातमध्ये ती भाजपनं भरून काढली तर दिल्लीत आम आदमी पक्षानं भरून काढली. अनेक राज्यांत लोकांना बदल हवेत. याची नोंद राजकीय पक्षांनी आणि जाणकारांनी घेतली पाहिजे. महाराष्ट्रातही एक पोकळी निर्माण झाली आहे. त्या पोकळीला पर्याय द्यायची ताकद फक्त राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहे. इतर पक्षात ती शक्ती कितपत आहे याबद्दल मी बोलणार नाही. पण भाजप प्रवृत्तीच्या विरोधात असलेल्या शक्तींना एकत्रित कशा करता येतील हे पाहिलं पाहिजे,' असं आवाहन शरद पवार यांनी केलं.

IPL_Entry_Point

विभाग