मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Grampanchayat Election: ..अन्यथा नवनियुक्त ग्रामपंचायत सदस्य व सरपंचांवर अपात्रतेची टांगती तलवार
Grampanchayat election
Grampanchayat election

Grampanchayat Election: ..अन्यथा नवनियुक्त ग्रामपंचायत सदस्य व सरपंचांवर अपात्रतेची टांगती तलवार

11 January 2023, 19:39 ISTShrikant Ashok Londhe

Grampanchayat election maharashtra 2022 : पुणे जिल्हा प्रशासनाने नवनियुक्त ग्रामपंचायत सदस्य व सरपंचांना निवडणूक खर्चाचा हिशोब देण्याचे आवाहन केले आहे. तसे न केल्यास त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई केली जाईल.

पुणे -  राज्यभरात १८ डिसेंबर रोजी पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये खर्चाचा हिशोब सादर न करणाऱ्या उमेदवारांवर अपात्रेची टांगती तलवार असून त्यांनी येत्या २० जानेवारी २०२३ पर्यंत निवडणूक खर्चाचा हिशेब सादर करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

पुणे जिल्ह्यामध्ये १८ डिसेंबर २०२२ रोजी २२१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूका पार पडल्या होत्या. या निवडणुकीचा निकाल २३ डिसेंबर २०२२ रोजी जाहीर करण्यात आला. या निवडणुकीमध्ये सदस्यपदासह थेट सरपंचपदाच्या २ हजार ७४ जागांसाठी ३ हजार ५३२ उमेदवारांनी निवडणूक लढविली होती. तसेच ७६१ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. 

निवडणूक लढवून विजयी झालेल्या व बिनविरोध निवडून आलेल्या एकूण ४ हजार २९३ उमेदवारांनी त्यांचा निवडणुकीच्या खर्चाचा हिशेब २० जानेवारी २०२३ पर्यंत द्यायचा आहे. हा हिशोब निवडणूक निर्णय अधिकारी अथवा तहसिल कार्यालयात प्रतिज्ञापत्रासह जमा करणे आवश्यक आहे. खर्चाचा हिशोब प्रतिज्ञापत्रासह सादर न करणाऱ्या उमेदवारांना अपात्र करण्याबाबतची कारवाई जिल्हा प्रशासनामार्फत तातडीने सुरु करण्यात येणार आहे. त्यामुळे उमेदवारांनी त्यांच्या निवडणूकीच्या खर्चाचा हिशेब तातडीने सादर करावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे यांनी केले आहे.