मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Govinda Job Reservation: चौफेर टीकेनंतर गोविंदांच्या नोकरी आरक्षणाबाबत सरकारचा महत्त्वाचा खुलासा

Govinda Job Reservation: चौफेर टीकेनंतर गोविंदांच्या नोकरी आरक्षणाबाबत सरकारचा महत्त्वाचा खुलासा

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Aug 20, 2022 12:25 PM IST

Chandrakant Patil on Govinda Job Reservation: गोविंदांच्या सरकारी नोकरीसाठी कुठलीही नवी तरतूद करण्यात आलेली नाही, असं उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज स्पष्ट केलं.

Chandrakant Patil on Govinda Job Reservation
Chandrakant Patil on Govinda Job Reservation

Chandrakant Patil Reply to Ajit Pawar: दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा देऊन त्यात थर लावणाऱ्या गोविंदांना सरकारी नोकरीत आरक्षण देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. त्यावरून सरकारवर टीकेचा भडिमार होत आहे. विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनीही यावरून मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे. अजित पवारांच्या या टीकेला उत्तर देताना उच्च व तंत्र शिक्षण मंत्री मुख्यमंत्र्यांच्या घोषणेबाबत महत्त्वाचा खुलासा केला आहे.

‘राज्य सरकारनं गोविंदांना नव्यानं कुठलंही आरक्षण दिलेलं नाही. खेळाडूंना सरकारी नोकरीत पाच टक्के आरक्षणाची तरतूद पूर्वीपासूनच आहे. त्या अंतर्गत ठराविक खेळांना मान्यता देण्यात आली आहे. या यादीत आता दहीहंडीचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळं गोविंदांना सरकारी नोकरीत मिळणारं आरक्षण यातूनच दिलं जाणार आहे. गोविंदांसाठी कुठल्याही अतिरिक्त आरक्षणाची तरतूद करण्यात आलेली नाही,’ असं चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं.

'राज्य सरकारच्या क्रीडा विभागाकडून खेळाडूंना मिळणाऱ्या पाच टक्के आरक्षणावर विरोधकांचा आक्षेप आहे का? तर तसं नाही. मग आरडाओरडा करण्याचं कारण नाही. गोविंदांना वेगळं पाच टक्के आरक्षण देण्यात आलेलं नाही. भविष्यात आणखी एखाद्या खेळाच्या संदर्भात मागणी झाल्यास त्यावर विचार करून तोही नोकरी आरक्षणाच्या कक्षेत आणता येईल. मग त्यात विटी-दांडूही जोडला जाऊ शकतो. खेळाला मान्यता देताना त्याच्या स्पर्धा घ्याव्या लागतात. मेडल्स मिळावे लागतात. मग त्यानुसार क्लास वन, क्लास टू असं आरक्षण दिलं जातं. इतकं सोपं असताना अवघड करून समाजाची दिशाभूल करणं चुकीचं आहे, असा टोला पाटील यांनी अजित पवार यांना हाणला. मंगळागौरला खेळाचा दर्जा द्या, अशी मागणी झाल्यास त्याचाही विचार करता येईल. त्यात काहीच चुकीचं नाही, असंही पाटील म्हणाले.

गोविंदांच्या नोकरी आरक्षणावर काय म्हणाले होते अजित पवार?

गोविंदांना सरकारी नोकरीत आरक्षण देण्याच्या निर्णयावर अजित पवार यांनी आश्चर्य व्यक्त केलं होतं. ‘दहीहंडीत सहभागी होणाऱ्या गोविंदांचं रेकॉर्ड आणि त्यांच्या पात्रतेबद्दलची माहिती मुख्यमंत्री कशी ठेवणार आहेत?, मला राज्यातील गोविंदाना नाउमेद करायचं नाही, पण सरकारी सेवेसाठी स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी काय करायचं? भावनेच्या भरात असे निर्णय घेणं योग्य नाही,’ असं अजित पवार यांनी म्हटलं होतं.

IPL_Entry_Point

विभाग