मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  C20 Summit in Nagpur: नागपुरातील सी-२० परिषदेच्या मंथनातून मोलाचे विचार बाहेर येतील
C20 Summit
C20 Summit

C20 Summit in Nagpur: नागपुरातील सी-२० परिषदेच्या मंथनातून मोलाचे विचार बाहेर येतील

19 March 2023, 6:44 ISTAshwjeet Rajendra Jagtap

G20 presidency: नागपुरातील सी-20 परिषदेच्या मंथनातून मोलाचे विचार बाहेर येतील, असा विश्वास सी-२० आयोजन समीतीचे सूस शेरपा डॉ. स्वदेश सिंह यांनी व्यक्त केला आहे.

C20 Summit in Nagpur: नागपूर शहराला मोठा वैचारिक वारसा लाभला आहे. याच शहरात जी-२० परिषदेअंतर्गत २० ते २२ मार्च २०२३ दरम्यान आयोजित होणाऱ्या सिव्हील सोसायटी अर्थात सी-२० परिषदेच्या मंथनातून महत्वाचे विचार बाहेर येतील, असा विश्वास सी-२० आयोजन समीतीचे सूस शेरपा डॉ. स्वदेश सिंह यांनी आज येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केला. या परिषदेत नागपूर आणि विदर्भातील २५ संस्थाही सहभागी होणार असून ‘नागपूर व्हॉईस’ उपक्रमाद्वारे जवळपास ४० संस्थांकडून सूचना प्राप्त झाल्याची माहिती त्यांनी दिली.

ट्रेंडिंग न्यूज

जी-२० परिषदेचे यजमानपद असणाऱ्या भारत देशात वर्षभर विविध एंगेजमेंट गृपच्या परिषदांचे आयोजन होत आहे. यापैकी एक असलेल्या सी-२० गृपच्या प्रारंभिक परिषदेचे आयोजन नागपुरात होणार आहे. या आयोजनाबाबत माहिती देण्यासाठी प्रेस क्लब येथे डॉ सिंह यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना संबोधित केले. सी-२० अयोजन समीतीचे सुस शेरपा किरण के. एम., समन्वयक पंकज गौतम, माध्यम समन्वयक डॉ. परिणीता फुके, पत्र सूचना कार्यालयाच्या अतिरीक्त महासंचालक स्मिता शर्मा, माहिती व जनसंपर्क विभागाचे संचालक हेमराज बागुल आदी यावेळी उपस्थित होते.

सी-२० ची प्रारंभिक बैठक नागपुरात

सिव्हिल सोसायटीच्या आयोजन समितीद्वारे मागील चार महिन्यांपासून देश-विदेशातील नागरी संस्थांसोबत विविध मंचांद्वारे समन्वय साधून आरोग्य, रोजगार, कला, मानवाधिकार, सेवा आदि चौदा विषय भारतातील सी-२० परिषदेच्या चर्चेसाठी निश्चित करण्यात आले आहेत. सी-२० ची प्रारंभिक बैठक नागपुरात होत आहे. या परिषदेतून महत्वाचे विचार बाहेर येतील आणि ३०-३१ जुलै २०२३ रोजी जयपूर येथे होणाऱ्या सी-२० परिषदेच्या शिखर परिषदेत सादर होणाऱ्या अंतिम प्रस्तावात हे विचार अंतर्भूत होतील, असा विश्वास डॉ. सिंह यांनी व्यक्त केला.

नागपूर व विदर्भातील २५ संस्थाही होणार सहभागी

जी-२० देशांच्या नागरी संस्थांचे जवळपास ६० प्रतिनिधी आणि भारतातील विविध नागरी संस्था व आमंत्रित देशांचे असे जवळपास ३०० प्रतिनिधी या परिषदेत सहभागी होणार आहेत. या परिषदेत सहभागी होण्यासाठी नागपूर व विदर्भातील जवळपास 1000 संस्थांनी अर्ज केले होते. यापैकी २५ संस्थांची या परिषदेत सहभागी होण्यासाठी निवड करण्यात आली आहे.

नागपूर व्हॉईस’द्वारे जवळपास 40 संस्थांच्या सूचना प्राप्त

‘नागपूर व्हॉईस’ उपक्रमाद्वारे जवळपास 40 संस्थांकडून सूचना प्राप्त झाल्याची माहितीही त्यांनी दिली. सी-20 परिषदेच्या आयोजनादरम्यान नागपूर व विदर्भात विविध सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या नागरी संस्थांना या उपक्रमांतर्गत सूचना व मते मागविण्यात आली होती. संस्थांकडून प्राप्त सूचना सी-20 च्या अध्यक्ष माता अमृतानंदमयी यांच्याकडे निवेदन स्वरुपात सुपूर्द करण्यात येणार असल्याचेही डॉ. सिंह यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रमुख पाहुणे

शहरातील रॅडिसन ब्लु हॉटेलमध्ये सी-२० चे आयोजन करण्यात आले. २० मार्च रोजी दुपारी ३ वाजता या परिषदेचे उद्घाटन होणार आहे. सामाजिक तथा अध्यात्मिक नेत्या माता अमृतानंदमयी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणाऱ्या या सोहळ्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जी-20 साठी भारताचे शेरपा डॉ. अमिताभ कांत, संयुक्त राष्ट्रसंघाचे भारतातील प्रतिनिधी शैामी शाह, इंडोनेशिया आणि ब्राझीलचे जी-20 शेरपा यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

विभाग