ST bus news : महिलांना आजपासून अर्ध्या किंमतीत एसटी प्रवास, सरकारी आदेश आला
ST Bus News : राज्य शासनाने महिला दिनाचे औचित्य साधून महिलांना एसटी प्रवासात ५० टक्के सूट जाहीर केली होती. या निर्णयाचा आदेश शासनाने काढला असून आज पासून ५० टक्के सवलतीचा लाभ महिलांना घेता येणार आहे.
मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिलांसाठी अनेक घोषणा केल्या. यातील महत्वाची म्हणजे, महिला सन्मान योजना असून या अंतर्गत एसटी प्रवासात ५० टक्के सवलत हा महत्वाचा निर्णय होता. याची अंमलबजावणी कधी होणार असा प्रश्न उपस्थित केला जात होता. दरम्यान राज्य सरकारने याबाबतचचा अध्यादेश काढला असून आज पासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे. आज पासून महिला ५० टक्के सवलतीचा लाभ घेऊ शकणार आहेत.
ट्रेंडिंग न्यूज
राज्य शासनाने यंदाच्या अर्थसंकल्पांत महिला सन्मान योजना जाहीर केली. या योजनेत महिलांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसेसच्या तिकीट दरात ५० टक्के सवलत देण्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली. ही योजना लवकर लागू करण्याची मागणी होत होती. त्यानुसार आज पासून एसटी महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसेस मधून महिलांना तिकीट दरात ५० टक्के सवलत देण्याच्या या योजनेच्या अंमलबजवणीला सुरुवात होणार आहे. ही रक्कम दरवर्षी राज्य शासन महामंडळाला देणार आहे.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त राज्य शासनाने ७५ वर्षे पूर्ण झालेल्या ज्येष्ठांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसेस मधून मोफत प्रवासाची सवलत जाहीर केली होती. तसेच ६५ ते ७५ वर्षाच्या ज्येष्ठांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसेस मधून तिकीट दरात ५० टक्के सवलत देण्याची घोषणा केली होती.