मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Shiv Sena Party Symbol एकनाथ शिंदेंचा नेम धनुष्य बाणावर; शिवसेना कसा करणार बचाव?
Maharashtra Political Crisis
Maharashtra Political Crisis
23 June 2022, 7:11 AM ISTGanesh Pandurang Kadam
  • Share on Twitter
  • Share on FaceBook
23 June 2022, 7:11 AM IST
  • Eknath Shinde to claim Shiv Sena Election Symbol: सुमारे ४० हून अधिक आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा करणारे बंडखोर शिवसेना नेते एकनाथ शिंदे हे पक्षाच्या निवडणूक चिन्हावर दावा करण्याच्या तयारीत आहेत.

शिवसेना नेतृत्वाविरोधात बंड करून दोन तृतीयांश आमदार फोडण्यात यशस्वी झालेल्या एकनाथ शिंदे यांनी आता पक्षच ताब्यात घेण्याची तयारी सुरू केल्याचं समजतं. आपलाच गट हा अधिकृत शिवसेना असल्याचं सांगत शिवसेनेच्या धनुष्य बाण या चिन्हावर एकनाथ शिंदे दावा करण्याची शक्यता आहे. त्यासाठी भाजपशी संबंधित कायदे पंडितांकडून त्यांना सर्व प्रकारची मदत केली जात असल्याची सूत्रांची माहिती आहे.

ट्रेंडिंग न्यूज

एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर शिवसेनेपुढं भाजपसोबत जाण्याचा प्रस्ताव ठेवला, मात्र तो मान्य होणं शक्य नव्हतं. तरीही शिवसेनेनं चर्चेची दारं खुली ठेवली. मात्र, दुसरीकडं शिंदे यांची गटनेते पदावरून हकालपट्टी केली व अजय चौधरी यांची विधीमंडळ पक्षाच्या गटनेते पदी नियुक्ती केली. एकनाथ शिंदे यांनी या नियुक्तीला आक्षेप घेतला. प्रत्युत्तर म्हणून शिंदे यांच्या गटानं सुनील प्रभू यांची प्रतोद पदावरून हकालपट्टी करत भरत गोगावले यांची मुख्य प्रतोद म्हणून नियुक्ती केली. तिथून खऱ्या अर्थानं शिवसेना विरुद्ध एकनाथ शिंदे गटातील कायदेशीर शहकाटशहाला सुरुवात झाली.

आता शिवसेनेचे आणखी काही आमदार शिंदे गटाला जाऊन मिळाले असल्यानं त्यांच्याकडं दोन तृतीयांश आमदार झाले आहेत. त्यामुळं आपला गट हाच अधिकृत असून हीच खरी शिवसेना असल्याचं शिंदे गटाचं म्हणणं आहे. शिंदे गट आता शिवसेनेच्या निवडणूक चिन्हावरही दावा करण्याची शक्यता आहे. भाजपच्या कायदेतज्ज्ञांची फौज याकामी त्यांना मार्गदर्शन करत असल्याचं समजतं.

कायदा काय सांगतो?

घटनातज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, शिंदे यांनी आता आमदारांच्या संख्याबळाचे व पाठिंब्याचे कितीही दावे केले तरी त्याला फारसा आधार नाही. नियमानुसार, अधिकृत गट म्हणून मान्यता मिळवायची असल्यास त्यांना दोन तृतीयांश आमदार सोबत घ्यावे लागणार आहेत. शिवसेनेचं सध्याचं संख्याबळ ५६ आहे. त्यानुसार ३७ आमदार शिंदे यांना आपल्या बाजूनं वळवावे लागतील. ते शक्य न झाल्यास विधानसभा अध्यक्ष बंडखोर आमदारांना अपात्र करू शकतात. आमदार अपात्र झाल्यास सगळा प्रश्नच निकाली निघेल. शिंदे यांनी ३७ आमदारांचा पाठिंबा दाखवल्यास मग कायदेशीर लढाई सुरू होईल. हा विषय सर्वोच्च न्यायालयातही जाऊ शकतो. पण यातील कोणता मार्ग शिंदे गट पत्करतो आणि शिवसेना त्यांना कसा प्रतिसाद देते यावर पुढची गणित अवलंबून असणार आहेत.