मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  ‘जर मला निलंबित केलं तर तुमच्या घरी येऊन आत्महत्या करणार’; महिला तलाठ्याच्या धमकीने खळबळ

‘जर मला निलंबित केलं तर तुमच्या घरी येऊन आत्महत्या करणार’; महिला तलाठ्याच्या धमकीने खळबळ

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Mar 15, 2023 09:38 PM IST

महिला तलाठ्याने तहसीलदार कार्यालयाबाहेर उपोषण करणाऱ्या कार्यकर्त्यांना आत्महत्या करण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यातीलकुंभीटोला गावात घडली आहे.

उपोषण करणारे कार्यकर्ते
उपोषण करणारे कार्यकर्ते

एका महिला तलाठ्याने तहसीलदार कार्यालयाबाहेर उपोषण करणाऱ्या कार्यकर्त्यांना आत्महत्या करण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना गडचिरोली जिल्ह्यातील  कुरखेडा तालुक्यातील कुंभीटोला गावात घडली आहे. कुरखेडा तालुक्यात सुरू असलेल्या अवैध रेती उपसा,  वाळू तस्करी व  विटभट्टी विरोधात कारवाई करण्याच्या मागणीसाठी उपोषण करणाऱ्यांना महिला तलाठ्याने आत्महत्येची धमकी दिली आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी उपोषणकर्त्यांनी कुरखेडा पोलिसांत धमकीच्या ध्वनिफितीसह तक्रार दाखल केली आहे. मागील वर्षभरापासून जिल्ह्यात सर्रासपणे गौण खनिजाची अवैध तस्करी सुरू असून प्रशासनाने डोळे झाकले आहेत. 

गौण खनिजांची तस्करी रोखण्याविषयी अनेक तक्रारी करून देखील प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे. यामुळे कुरखेडा तालुक्यातील कुंभीटोला गावातील नागरिकांनी वाळू तस्करांविरोधात कारवाई करण्याची मागणी करत तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. आज उपोषणाचा तिसरा दिवस असल्याने प्रशासनाकडून कारवाईबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत. हे लक्षात येताच कुंभीटोला गावातील महिला तलाठ्याने उपोषणकर्त्यांपैकी चेतन गाहाने यांना फोन करून ‘मी निलंबित झाल्यास तुला सोडणार नाही, तुझ्या घरी येऊन आत्महत्या करेल.’ अशा प्रकारची धमकी दिली. यामुळे उपोषणकर्त्यांमध्ये एकच खळबळ उडाली. त्यांनी या प्रकरणाची पोलिसांत तक्रार केली आहे. दोघांतील संभाषणाची ध्वनिफीतदेखील असून यात ती महिला तलाठी धमकी देत असल्याचे स्पष्ट ऐकू येत आहे. या प्रकरणी पोलीस संबंधितावर कारवाई करण्याच्या तयारीत आहेत.

गडचिरोलीतील अवैध वाळू तस्करीचा मुद्दा गंभीर असून प्रशासनाच्या आशीर्वादाने हे तस्कर निर्ढावले आहे. त्यामुळे कारवाईचा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा कनिष्ट पदावरील कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात येत असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष आहे. यातूनच असे प्रकार घडत असल्याची चर्चा कर्मचारी वर्तुळात आहे.

IPL_Entry_Point

विभाग