मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  '२६ लाख कोटी तुम्ही कमावले आणि महाराष्ट्राला टॅक्स कमी करायला सांगता?'

'२६ लाख कोटी तुम्ही कमावले आणि महाराष्ट्राला टॅक्स कमी करायला सांगता?'

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
May 20, 2022 04:37 PM IST

जीवनावश्यक वस्तूच्या महागाईसाठी राज्यातील सरकारला दोष देणाऱ्या भाजपवर काँग्रेसनं जोरदार हल्ला चढवला आहे.

नरेंद्र मोदी
नरेंद्र मोदी (ANI)

देशातील महागाई व इंधनावरील कराच्या मुद्द्यावरून काँग्रेसनं केंद्रातील भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. 'केंद्र सरकारनंच इंधनावरील करातून २६ लाख कोटी रुपये कमावले आहेत आणि राज्य सरकारनं कर कमी करावेत अशी अपेक्षा केंद्र सरकार व भाजप करत आहे, हे अत्यंत चुकीचं आहे, असा संताप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केला आहे.

ते पत्रकारांशी बोलत होते. 'महागाईचा विषय आला की राज्यातील विरोधी पक्ष महाविकास आघाडी सरकारकडं बोट दाखवतो. हा त्यांचा कांगावा आहे. विरोधकांकडून राज्य सरकारवर होणारे आरोप बिनबुडाचे आहेत. महाविकास आघाडी सरकारनं अडीच वर्षात कोणतीही करवाढ केलेली नाही. जीएसटीमुळं राज्याच्या हातात काही राहिलेलं नाही आणि केंद्र सरकारनं महाराष्ट्राचे कोट्यवधी रुपये थकवलेले आहेत. देशाच्या तिजोरात सर्वात जास्त पैसा मुंबई, महाराष्ट्रातून जातो, पण केंद्र सरकार महाराष्ट्राला निधी देताना मात्र हात आखडता घेते, हा महाराष्ट्रावर अन्याय आहे, असं पटोले म्हणाले.

 'देशातील सध्याची परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. रुपयाची दररोज घसरण होत आहे. महागाई व बेरोजगारी प्रचंड वाढलेली आहे. जनतेच्या जीवन मरणाचे प्रश्न असताना धार्मिक मुद्दे पुढं करून वातावरण बिघडवायचं व मुख्य प्रश्नांवरून जनतेचं लक्ष दुसरीकडं वळवायचं हे एक मोठं षडयंत्र भाजपकडून सुरू आहे. परंतु काँग्रेस जनतेच्या हितासाठी केंद्र सरकारला जाब विचारत राहील, असं पटोले यांनी ठणकावलं.

'केंद्रातील मोदी सरकार हे सर्व आघाड्यांवर कुचकामी ठरलं आहे. महागाई, शेतकरी, कामगार, गरिबांचं केंद्र सरकार प्रश्न सोडवू शकलं नाही. काँग्रेस पक्षाला आजच्या परिस्थितीची चिंता वाटते म्हणून जनतेला न्याय कसा मिळेल यासाठी आमची लढाई सुरू आहे. केंद्र सरकारनं जनतेला दिलासा देण्याचे निर्णय घेतले पाहिजेत, मात्र त्याकडं दुर्लक्ष करून धार्मिक मुद्दे पुढे केले जात आहेत. हिंदू धर्माबद्दल आम्हाला दुसऱ्यांकडून शिकण्याची गरज नाही, माणुसकी हा खरा धर्म असून ती जोपासली पाहिजे. जनतेचे प्रश्नच सोडवणार नसले तर ते सरकार काय कामाचे, असा सवाल त्यांनी केला.

IPL_Entry_Point

विभाग