मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  MPSC परीक्षा पद्धतीतील बदलाची अंमलबजावणी कधीपासून?; काँग्रेसच्या विरोधामुळं चर्चेला उधाण

MPSC परीक्षा पद्धतीतील बदलाची अंमलबजावणी कधीपासून?; काँग्रेसच्या विरोधामुळं चर्चेला उधाण

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Dec 30, 2022 02:47 PM IST

Congress on MPSC Exam Pattern Changes : एमपीएससी परीक्षा पद्धतीतील बदलाच्या निर्णयाच्या अंमलबजावणीची घाई करू नये, अशी मागणी काँग्रेसनं केली आहे.

MPSC Student
MPSC Student

Congress on MPSC Exam Pattern Changes : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून होणाऱ्या परीक्षा केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याची अंमलबजावणी २०२३ पासून केली जाणार आहे. एमपीएससीच्या या निर्णयास काँग्रेसनं जोरदार विरोध केला आहे. 'परीक्षा पद्धतीतील बदलाचं आकलन करण्यास विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ मिळावा यासाठी ही नवीन पद्धत दोन वर्षांनी, म्हणजेच २०२५ पासून लागू करावी. विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेऊन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने आपला अहंकार बाजूला ठेवावा, अशी मागणी काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगासंदर्भात विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांवर अतुल लोंढे यांच्या पुढाकारानं विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला लोकसेवा आयोगाच्या सचिव सुवर्णा खरात यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

'कोरोनामुळं दोन वर्षे विद्यार्थांचं मोठं नुकसान झालं आहे. परीक्षांची तयारी करण्याबरोबरच विद्यार्थ्यांना या परीक्षेच्या संदर्भातील अनेक समस्यांनाही तोंड द्यावं लागत आहे. ऑगस्टपासून परीक्षा पद्धतीत बदल केला आहे, हा बदल आत्मसात करण्यासाठी विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ मिळणं आवश्यक आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग ही स्वायत्त संस्था आहे, या संस्थेनं विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेतलं पाहिजे. एमपीएससीसाठी प्रयत्न करणाऱ्यांमध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. दोन वर्षांनंतर नवीन पद्धतीनं परीक्षा घेतल्या तर त्याचा फायदा या विद्यार्थ्यांना होऊ शकेल याचा सकारात्मक विचार करावा, अशी आग्रही भूमिका लोंढे यांनी मांडली.

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर केलेल्या बदलानुसार अभ्यास करण्यास एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना वेळ मिळाला पाहिजे. या नवीन पद्धतीने एमपीएससीच्या परिक्षा २०२३ पासूनच घेतल्या तर त्याचा फायदा केंद्रीय लोकसेवा परिक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना जास्त होईल व एमपीएससीची तयारी करणाऱ्यांचे नुकसान होऊ शकते. असे मुद्दे लोंढे यांनी मांडले असून एमपीएससी संदर्भातील लढ्यात काँग्रेस पक्ष विद्यार्थ्यांसोबत असल्याचं त्यांनी सांगितलं. काँग्रेसच्या या विरोधानंतर एमपीएससी आपल्या निर्णयात बदल करणार का, याबाबत उत्सुकता आहे.

IPL_Entry_Point

विभाग