मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Eknath Shinde: प्लास्टिक बंद म्हणजे बंद! मुख्यमंत्र्यांचे कठोर अंमलबजावणीचे संकेत

Eknath Shinde: प्लास्टिक बंद म्हणजे बंद! मुख्यमंत्र्यांचे कठोर अंमलबजावणीचे संकेत

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Oct 20, 2022 02:58 PM IST

single use plastic ban: एकल वापराच्या प्लास्टिकवरील बंदीच्या निर्णयाची कठोरपणे अंमलबजावणी केली जाईल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज स्पष्ट केलं.

Single use plastic ban
Single use plastic ban

Eknath Shinde on single use plastic ban: राज्य सरकारनं प्रदूषणमुक्त दिवाळी संकल्प अभियान सुरू केलं असून या अंतर्गत आज शालेय विद्यार्थ्यांसह मंत्रालयातील कर्मचारी व अधिकाऱ्यांना प्रदूषणुक्त दिवाळी साजरी करण्याची शपथ देण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही यावेळी शपथ घेतली. यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी एकल वापराच्या प्लास्टिक बंदीबाबत ठाम भूमिका घेतली. 

‘वातावरणीय बदलांचे दुष्परिणाम सर्वत्र जाणवत आहेत. यामुळे पर्यावरण रक्षणाची आवश्यकता लक्षात घेऊन प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्यासाठी शासनानं पुढाकार घेतला आहे. मंत्रालयात या संबंधीचा कार्यक्रम आज झाला. कार्यक्रमास उपस्थित असलेल्या सिद्धी निकम या दिव्यांग विद्यार्थींनीनं आपण वसुंधरेचे रक्षक बनून पर्यावरणपूरक जीवनशैलीचा अंगिकार करूयात, असं आवाहन यावेळी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह उपस्थित सर्वांना केलं. सरकारनं एकल वापराच्या प्लास्टिक वापरावर पूर्ण बंदी आणावी तर, दैनंदिन वापरात नागरिकांनी प्लास्टिकचा वापर टाळावा, अशी विनंतीही तिनं केली.

सिद्धी निकम या विद्यार्थ्यांनीनं केलेल्या विनंतीचा धागा पकडून मुख्यमंत्री शिंदे यांनी प्लास्टिक बंदीच्या संदर्भात भाष्य केलं. ‘वापरा आणि फेका’ प्रकारच्या अर्थात एकल वापराच्या प्लास्टिकवर बंदी घालण्याचा निर्णय राज्य सरकारनं आधीच घेतलेला आहे. यापुढं या निर्णयाची कडक अंमलबजावणी करण्यात येईल, असं मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केलं. 

'करोनाच्या काळातील निर्बंध उठवण्यात आले आहेत. आता सर्व सण उत्साहात साजरे केले जात आहेत. दिवाळी सण देखील उत्साहात साजरा होणार आहे. मात्र, ते करताना पर्यावरणाचा समतोल राखणं गरजेचं आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले. 'मागील काही वर्षे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फत यासाठी जनजागृती करण्यात येत आहे. परिणामी ध्वनी आणि हवेतील प्रदूषणाचे प्रमाण कमी होत आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि शासनाचा पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या संयुक्त विद्यमानं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.

IPL_Entry_Point

विभाग