मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra Budget : फडणवीसांचं कौतुक तर ठाकरेंना टोला, अर्थसंकल्पावर मुख्यमंत्री काय म्हणाले?

Maharashtra Budget : फडणवीसांचं कौतुक तर ठाकरेंना टोला, अर्थसंकल्पावर मुख्यमंत्री काय म्हणाले?

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Mar 09, 2023 06:43 PM IST

Maharashtra Budget : गेल्या अडीच वर्षात जी विकासकामं ठप्प होती, त्याला चालना देण्याचं काम आमच्या सरकारनं केलं आहे, असं म्हणत मुख्यमंत्री शिंदेंनी ठाकरेंवर टीका केली आहे.

Maharashtra Chief Minister Eknath Shinde
Maharashtra Chief Minister Eknath Shinde (ANI)

Maharashtra Budget Live Updates : शिंदे-फडणवीस सरकारचा पहिला अर्थसंकल्प अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मांडला आहे. शेतकरी आणि महिलांना दिलासा देणाऱ्या अनेक घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आल्या आहेत. बजेट सादर केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत एक पत्रकार परिषद घेतली आहे. त्यात मुख्यमंत्री शिंदे यांनी अर्थसंकल्पावरून देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक करताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे.

माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, गेल्या अडीच वर्षात जी विकासकामं ठप्प झाली होती, त्याला चालना देण्याचं काम आमच्या सरकारनं अर्थसंकल्पाच्या माध्यमातून केलं आहे. महाराष्ट्रात विकासाचा जो मेगाब्लॉक तयार झाला होता, तो देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पाच्या माध्यमातून दूर केला आहे, त्याचा परिणाम आपल्याला आगामी काळात दिसतील, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी फडणवीसांचं कौतुक केलं आहे. याशिवाय मविआच्या काळात विकासकामं थांबलेली होती, असं सांगत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टिकास्त्र सोडलं आहे.

महाराष्ट्रात पहिल्यांदाच आमच्या सरकारनं लेक लाडकी ही योजना सुरू केली आहे. तीन कोटी असंघटीत कामगारांच्या विकासासाठी विशेष तरतूक अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. कामगारांच्या मुलांच्या आरोग्यासाठी आणि शिक्षणासाठी सरकार आवश्यक पावलं उचलणार असल्याचंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. राज्यातील तरुणांना रोजगारासाठी आम्ही योजना आणत असून त्यांचं आर्थिक स्वावलंबन करण्यावर सरकारचा भर असणार असल्याचंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

महाराष्ट्राचा अर्थसंकल्प राज्याचा सर्वांगीण विकास डोळ्यासमोर ठेवूनच सादर करण्यात आला आहे, विकासाचा सर्वसमावेश असा अर्थसंकल्प देवेंद्र फडणवीस यांनी सादर केला असून त्याद्वारे शेतकरी, कष्टकरी, कामगार, महिला, तरुण, जेष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांना दिलासा देण्यात आला आहे. महाराष्ट्र हे शेतकऱ्यांचं राज्य आहे. शेतकऱ्यांसाठी आम्ही नमो ही ऐतिहासिक योजना सुरू केली आहे. त्यामुळं शेतकऱ्यांच्या कुटुंबाला आधार मिळणार असून शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवणं हाच आमचा उद्देश असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

IPL_Entry_Point