मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Ajit Pawar : चिंचवड जिंकता आलं नाही! अजित पवार काय म्हणाले बघाच!

Ajit Pawar : चिंचवड जिंकता आलं नाही! अजित पवार काय म्हणाले बघाच!

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Mar 02, 2023 03:21 PM IST

Ajit Pawar on Pune bypoll Result : चिंचवडचा निकाल अजित पवार यांच्यासाठी धक्कादायक मानला जात आहे. त्यांनी या निकालावर प्रतिक्रिया दिली आहे.

Ajit Pawar
Ajit Pawar

Ajit Pawar on Chinchwad bypoll Result : पुण्यातील कसबा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचा विजय झाला असला तरी चिंचवडमध्ये आघाडीचा पराभवाच्या छायेत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यासाठी हा निकाल धक्कादायक मानला जात आहे. अजित पवार यांनी स्वत: या निकालाचं विश्लेषण केलं आहे.

चिंचवडमध्ये भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप यांनी मोठी आघाडी घेतली आहे. ही आघाडी तोडणं आघाडीचे उमेदवार नाना काटे यांना शक्य नसल्याचं दिसत आहे. तिथं अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांनी लक्षणीय मतं मिळवत आघाडीचा विजय हिरावून घेतल्याचं बोललं जात आहे. अजित पवार यांनी या गृहितकास दुजोरा दिला आहे.

चिंचवडमध्ये उमेदवारी कोणाला द्यायची याविषयी सुरुवातीला संभ्रम होता. राहुल कलाटे यांनीही माझ्याकडं उमेदवारी मागितली होती. मी उद्धव ठाकरे, जयंत पाटील यांच्याशी चर्चा करून शेवटी नाना काटे यांचं नाव निश्चित केलं. त्यामुळं राहुल कलाटे यांनी बंडखोरी करून अपक्ष अर्ज भरला. त्यांच्या उमेदवारीचा फटका आम्हाला बसलेला सरळसरळ दिसतोय, असं अजित पवार म्हणाले.

चिंचवडमध्ये आम्ही चुरशीची लढत दिली आहे. नाना काटे आणि राहुल कलाटे यांची मतं एकत्रित केल्यास ती भाजपच्या उमेदवारापेक्षा जास्त होतात हे लक्षात घ्यायला हवं. त्यामुळं भविष्यात महाविकास आघाडीच्या उमदेवाराविरोधात कुठलीही बंडखोरी होणार नाही याची अधिक काळजी आम्हाला घ्यावी लागणार आहे, असं अजित पवार म्हणाले.

वंचितच्या भूमिकेचा परिणाम नाही!

वंचित बहुजन आघाडीनं राहुल कलाटे यांना पाठिंबा दिल्याचा काहीही फटका बसला नसल्याचं अजित पवार यांनी स्पष्ट केलं. ‘वंचित’चे तिथले अनेक पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले होते. त्यांच्या पक्षाचा निर्णय त्यांना पटला नव्हता. मात्र, काही ठिकाणची मतं राहुल कलाटे यांना गेली. तिथं मतांची विभागणी झाली, असं अजित पवार म्हणाले.

IPL_Entry_Point

विभाग