मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Cabinet Meeting: पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर आज मंत्रिमंडळाची बैठक; मुंबईतील राड्यावर चर्चा होणार?

Cabinet Meeting: पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर आज मंत्रिमंडळाची बैठक; मुंबईतील राड्यावर चर्चा होणार?

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Sep 12, 2022 09:10 AM IST

Maharashtra Cabinet Meeting : गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. परिणामी ग्रामीण भागांसह आता शहरी भागांतही पूरस्थिती निर्माण होत आहे.

Maharashtra Cabinet Meeting
Maharashtra Cabinet Meeting (HT)

Maharashtra Cabinet Meeting : सणासुदीमुळं गेल्या अनेक दिवसांपासून शिंदे-फडणवीस सरकारची कॅबिनेट बैठक होऊ शकली नव्हती. परंतु आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडण्याची शक्यता आहे. या बैठकीत नवीन पुनर्वसन धोरणाला मान्यता मिळण्याची शक्यता असून प्रभादेवीत झालेल्या राड्यावरही चर्चा होण्याची अंदाज व्यक्त केला जात आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. याशिवाय भूस्खलन आणि दरड कोसळणे यांसारख्याही घटना घडलेल्या आहेत. त्यामुळंच आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत नवीन पुनर्वसन धोरणाला मान्यता मिळण्याची शक्यता आहे. ऑगस्ट महिन्यात पार पडलेल्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोविंदांना आर्थिक मदत करण्याची घोषणा केली होती. याशिवाय ज्या लोकांचं वय ७५ पेक्षा जास्त झालंय त्यांना एसटी बसमधून मोफत प्रवास देण्याचा निर्णय घेतला होता.

प्रभादेवीतील राड्यावर चर्चा होणार?

गणेश विसर्जनावेळी शिंदे गट आणि शिवसेना आमने-सामने आल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यावेळी शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी गोळीबार केल्याचा आरोप शिवसेनेनं केला होता. त्यानंतर त्यांना अटक करण्यात यावी, या मागणीसाठी शिवसैनिकांनी पोलीस ठाण्यात आंदोलन केलं होतं. त्यानंतर आमदार सरवणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामुळं आता आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुंबईतील कायदा व सुव्यस्थेसह शिवसेना आणि शिंदे गटाच्या राड्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर...

मंत्रिमंडळाची बैठक संपल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात ते मंत्री संदीपान भुमरेंच्या पैठण विधानसभा मतदारसंघात जाहीर सभा घेणार आहेत. याशिवाय जिल्ह्यातील विविध विकासकामांचा आढावादेखील घेणार आहेत.

IPL_Entry_Point