मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  शिवसेनेच्या बंडात भाजपची एंट्री; फडणवीस-शिंदे यांची वडोदऱ्यात भेट झाल्याची चर्चा

शिवसेनेच्या बंडात भाजपची एंट्री; फडणवीस-शिंदे यांची वडोदऱ्यात भेट झाल्याची चर्चा

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Jun 26, 2022 06:31 PM IST

भाजपा नेते देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात वडोदरा येथे भेट झाल्याचे म्हटले जात आहे. त्याचबरोबरयांनी बंडखोर आमदारांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा केल्याचे वृत्त आहे.

फडणवीस-शिंदे यांची वडोदऱ्यात भेट झाल्याची चर्चा
फडणवीस-शिंदे यांची वडोदऱ्यात भेट झाल्याची चर्चा

मुंबई – महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाला दररोज नवी कलाटणी मिळत आहे. शिवसेना सरकारपेक्षा आपला पक्ष वाचवण्याचा प्रयत्न करत असतानाच आता भाजपही सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे आणि भाजप नेते व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात भेट झाल्याची माहिती  समोर आली आहे. मात्र भाजपाने या संपूर्ण प्रकरणावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. माध्यमांच्या वृत्तानुसार, भाजपा नेते देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात वडोदरा येथे भेट झाल्याचे म्हटले जात आहे. त्याचबरोबर यांनी बंडखोर आमदारांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा केल्याचे बोलले जात आहे. 

देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी रात्री एकनाथ शिंदे यांची वडोदरा येथे भेट घेतल्याचं सांगितलं जात आहे. विशेष म्हणजे त्यावेळी गृहमंत्री अमित शाहदेखील वडोदऱ्यात असल्याची चर्चा होती. शुक्रवारी रात्री एकनाथ शिंदे गुवाहाटीने वडोदराला रवाना झाले होते. अमित शाह आणि फडणवीसांची भेट घेऊन शनिवारी सकाळी ६.४५ ला एकनाथ शिंदे गुवाहाटीला परतल्याची माहिती समोर आली आहे.

शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे  यांनी पुकारलेल्या बंडाशी भाजपचा कोणताही संबंध नाही, असं वारंवार सांगितलं जात आहे. पण, आता भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बंडखोर आमदारांशी चर्चा केल्याची माहिती समोर येत आहे. 

एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यापासून भाजपने अत्यंत सावध आणि शांत अशी भूमिका घेतली आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडामागे भाजपचा हात असल्याचा दावा सत्ताधाऱ्यांनी केला आहे. पण, भाजपने आमचा कोणताही संबंध नाही असं वारंवार सांगितलं. मात्र, आता गुवाहाटीमध्ये मुक्कामी असलेल्या बंडखोर आमदारांशी देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा तसेच बडोदऱ्यात भेट झाल्याचे बोलले जात आहे. 

IPL_Entry_Point