मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Ashadhi Palkhi Sohala : माऊलींचा पालखी सोहळा परतला अलंकापुरीत स्वगृही

Ashadhi Palkhi Sohala : माऊलींचा पालखी सोहळा परतला अलंकापुरीत स्वगृही

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Jul 24, 2022 12:58 AM IST

आषाढीवारी निमित्त तब्बल दोन वर्षानंतर पंढरपुरला गेलेला पालखी सोहळा पुणे जिल्ह्यात आळंदीत शनिवारी स्वगृही परतला

Mauli palkhi sohala
Mauli palkhi sohala

Ashadhi wari 2022 तब्बल दोन वर्षांच्या प्रतिक्षेनंतर संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा आषाढी वारीसाठी पंढरपुरला गेला होता. या वर्षी लाखोभाविकांनी या सोहळ्यात सहभाग नोंदवला होता. हा सोहळा विठूरायाच्या दर्शनानंतर शनिवारी परत अलंकापूरीत परत आला. यावेळी पावसाच्या सरींनी आणि टाळ मृदुंगाच्या गजरात पालखी सोहळ्याचे अलंकापुरीत स्वागत करण्यात आले. रविवारी दुपारी साडेबाराला श्रींची पालखीतून नगरप्रदिक्षणा मिरवणूक होईल. हजेरी मारुती मंदिरात पालखी सोबतच्या दिंड्यांचे हजेरीचे अभंग घेतले जाणार आहेत.

आषाढीवारीसाठी गेलेल्या माऊलींचा सोहळा तब्बल ३२ दिवसांनी शनिवारी स्वगृही परतला. आळंदीच्या वेशीवर येतातच प्रथेपरंपरेनुसार चोपदारांकडून ‘सर्व सुख गोडी साही शास्रे निवडी’ या हरिपाठारावरील शेवटच्या अभंगावर सुरु असलेल्या चक्रांकित महाराजांच्या कीर्तनात माऊलींची पालखी दाखल झाल्याची वर्दी देण्यात आली. चक्रांकित महाराजांच्या दिंडीने पालखीला सामोरे जाऊन पालखीचे स्वागत करून माऊलींची आरती केली. यावेळी वरून राजाने हलक्या सरींच्या रुपात उपस्थिती लावत पालखी सोहळ्याचे स्वागत केले. पालखीच्या स्वागतासाठी संपूर्ण अलंकापुरी या वेशीवर आली होती. पालखीने नगरपालिका चौक, श्रीविष्णू मंदिर, श्रीराम मंदिर, हरीहरेद्रस्वामी मठमार्गे महाद्वारातून मंदिरात प्रवेश केला. या नंतर माऊली या विणामंडपात स्थिरावल्या.

या नंतर माऊलींच्या पादुकांना आळंदीत घेऊन येण्यासाठी स्थानिक नागरिक, ज्ञानेश्वर विद्यालयाचे विद्यार्थी तसेच भाविकांनी थोरल्या व धाकट्या पादुका मंदिरस्थळी मोठी गर्दी केली होती. थोरल्या पादुका मंदिरात पहिला व धाकट्या पादुका स्थळावर दुसरा विसावा घेण्यात आला. धाकट्या पादुका विसाव्यावर पालखीवर फुलांचा वर्षाव करण्यात आला.

पालखीतील श्रींच्या पादुका गाभाऱ्यात समाधीसमोर विराजमान करून संस्थांनतर्फे माऊलींची आरती घेण्यात आली. आरतीनंतर श्री नरसिंग सरस्वती स्वामी महाराज मुळपीठ देवस्थानतर्फे श्रीना पिठलं भाकरीचा महानैवेद्य अर्पण करण्यात आला. तद्नंतर हैबतबाबांच्या ओवरीकडे आरती घेण्यात आली.

IPL_Entry_Point