मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Amravati Murder Case : उमेश कोल्हे हत्याकांडातील सातही आरोपी NIA च्या ताब्यात

Amravati Murder Case : उमेश कोल्हे हत्याकांडातील सातही आरोपी NIA च्या ताब्यात

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Jul 04, 2022 11:48 PM IST

अमरावतीमधील मेडिकल व्यावसायिकाच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या सातही आरोपींना आज राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) ताब्यात देण्यात आले.यामध्ये मुख्य सुत्रधाराचाही समावेश आहे.

उमेश कोल्हे हत्याकांडातील आरोपी
उमेश कोल्हे हत्याकांडातील आरोपी

अमरावती - येथील व्यावसायिक उमेश कोल्हे यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या सातही आरोपींना आज (सोमवार) रात्री राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) ताब्यात देण्यात आले. आरोपींमध्ये मुख्य सूत्रधार इरफान खान याचाही समावेश आहे.

या आरोपींना ८ जुलैपूर्वी ‘एनआयए’च्या न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. आरोपी मुदस्सीर अहमद ऊर्फ सोनू रजा शेख इब्राहिम (२२), शाहरुख पठाण ऊर्फ बादशाह हिदायत खान (२५), अब्दुल तौफिक ऊर्फ नानू शेख तस्लिम (२४), शोएब खान ऊर्फ भुऱ्या साबीर खान (२२), अतिब रशीद आदिल रशीद (२२), युसूफ खान बहादूर खान (४४) तसेच सूत्रधार शेख इरफान शेख रहीम (३५) यांना प्रथम श्रेणी न्यायदंडाधकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले. ‘एनआयए’ने या सर्व आरोपींना आपल्या ताब्यात देण्याची विनंती न्यायालयात केली. त्यानंतर रात्री औपचारिक प्रक्रिया पूर्ण करून सर्व आरोपींना ‘एनआयए’च्या ताब्यात देण्यात आले.

२१ जून रोजी उमेश कोल्हे यांची हत्या रात्री साडेदहाच्या दरम्यान घडली होती. उमेश कोल्हे अमित मेडिकल स्टोअर हे दुकान चालवतात. हे दुकान बंद करून ते त्यांचा मुलगा संकेत कोल्हे व पत्नी वैष्णवीसह स्कूटरने घराकडे जात असताना ही घटना घडली. या हत्याप्रकरणात आधी ६ जणांना अटक करण्यात आली होती, त्यानंतर मुख्य आरोपी इरफान खानला अटक केली होती. 

इरफान खान याने उमेशच्या हत्येचा कट रचला आणि त्यासाठी पाच जणांची मदत घेतली. इरफानने त्या पाच जणांना १० हजार रुपये देण्याचे आणि कारमध्ये सुरक्षितपणे पळून जाण्यास मदत करण्याचे आश्वासन दिले होते,अशी माहिती पोलिसांनी दिली.

IPL_Entry_Point

विभाग