मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Ajit Pawar : गणेशोत्सव काळातील रेल्वे तिकिटांचे आरक्षण एका मिनिटात फुल्ल होतेच कसे?; अजितदादांना 'हा' संशय

Ajit Pawar : गणेशोत्सव काळातील रेल्वे तिकिटांचे आरक्षण एका मिनिटात फुल्ल होतेच कसे?; अजितदादांना 'हा' संशय

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
May 24, 2023 01:11 PM IST

Ajit Pawar on Konkan Railway Reservation : गणपती उत्सवाच्या काळात कोकण रेल्वे आरक्षणामध्ये होणाऱ्या गैरप्रकाराची चौकशी करण्याची मागणी अजित पवार यांनी केली आहे.

Ajit Pawar on Konkan Railway Reservation
Ajit Pawar on Konkan Railway Reservation

Ajit Pawar writes to Ashwini Vaishnaw : 'गणेशोत्सव काळात कोकणात जाणाऱ्या गाड्यांचे आरक्षण अवघ्या एका मिनिटात फुल्ल झाल्याचं समोर आलं आहे. दरवर्षी थोड्याफार फरकानं असाच प्रकार घडत असल्यानं अनेक चाकरमान्यांना गावी जाताना अनंत अडचणींचा सामना करावा लागतो. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केंद्रीय रेल्वे मंत्र्यांना पत्र लिहून आरक्षणातील गैरप्रकारांची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

अजित पवार यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी बिष्णोई व रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे या दोघांनाही या संदर्भात पत्र लिहिलं आहे. 'गणेशोत्सव हा महाराष्ट्राचा आणि विशेषत: कोकणवासीयांच्या अस्मितेचा, श्रद्धेचा, जिव्हाळ्याचा विषय आहे. गणेशोत्सवाची वाट प्रत्येक मराठी माणूस वर्षभर बघत असतो. कामानिमित्त जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात असला, कितीही अडचणी असल्या तरी कोकणातील चाकरमानी गणेशोत्सवासाठी कोकणात आपल्या गावी जातोच. त्याची तयारी व नियोजन प्रत्येक कोकणवासीय चाकरमानी अगदी वर्षभरापासून करत असतो, याकडं अजित पवार यांनी लक्ष वेधलं आहे.

'गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई-गोवा महामार्गाचे काम अत्यंत संथगतीने सुरू आहे. या महामार्गाची अवस्था अत्यंत बिकट आहे. या महामार्गावरून प्रवास करणं त्रासदायक असल्यामुळं कोकणवासीयांकडं रेल्वे हा एकच पर्याय आहे. मात्र, तिथंही आरक्षण करताना कोकणी चाकरमान्यांना त्रास होत आहे. गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या रेल्वेगाड्यांना आतापासूनच प्रतिक्षा यादींचे फलक लागले आहेत. मुंबईच्या छत्रपती टर्मिनसवरून १५ सप्टेंबरला सुटणाऱ्या कोकणकन्या एक्सप्रेसची प्रतिक्षा यादी अवघ्या दीड मिनिटांतच हजारापार गेल्याची बाब समोर आली आहे. तर १६ सप्टेंबरचं आरक्षण करण्यासाठी गेलेल्या प्रवाशांना सर्वच गाड्यांसमोर ‘रिग्रेट’ हा मेसेज येत आहे. त्यामुळं आरक्षणात गैरप्रकार होत असावेत, अशी शंका घेण्यास वाव आहे. हा प्रकार अत्यंत गंभीर आहे, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

'रेल्वे तिकिटांची बेकायदा विक्री करणारे दलाल मोठ्या संख्येने तिकिटांचं आरक्षण करून ते चढ्या दराने विक्री करत असल्याचा आजपर्यंतचा अनेकांचा अनुभव आहे. सर्वसामान्य प्रवासी सणउत्सवाला गावी जात असतात, त्यावेळीच दलालांकडून मोठ्या संख्येने आरक्षण करून चढ्या दरानं विक्री करण्याचे रॅकेट सुरू आहे. यामध्ये कोणाचे हितसंबध गुंतले आहेत? यात कोण-कोण सामील आहे, याची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे, अशी मागणी अजित पवार यांनी केली आहे.

अतिरिक्त रेल्वे गाड्या सोडा!

या तिकीटाच्या आरक्षणांची मध्य रेल्वे आणि कोकण रेल्वनं चौकशी करावी. अशा रेल्वे दलालांवर नियंत्रण ठेवावं. तसंच, कोकणच्या चाकरमान्यांच्या सोयीसाठी गणेशोत्सव काळात अतिरिक्त रेल्वे गाड्या कोकणात सोडण्यात याव्यात, अशी मागणीही अजित पवार यांनी केली आहे.

IPL_Entry_Point