मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Swachh Pune: फिरतो उंच आकाशी, परी ध्यास स्वच्छ पुण्याचा बाळगतो मनाशी!

Swachh Pune: फिरतो उंच आकाशी, परी ध्यास स्वच्छ पुण्याचा बाळगतो मनाशी!

HT Marathi Desk HT Marathi
Aug 15, 2022 07:24 PM IST

एखाद्या शहराला सुंदर करण्यामागे हजारो अदृष्य हात कार्यरत असतात. असंच पुण्यातलं एक व्यक्तिमत्व म्हणजे पुनीत शर्मा. या लेखातून शर्मा यांच्या 'स्वच्छ पुणे' या उपक्रमाची ओळख करून देत आहेत त्यांचे सहकारी कॅप्टन अविनाश चिकटे.

Captain Puneet Sharma
Captain Puneet Sharma

-कॅप्टन अविनाश चिकटे

तो माझा सहकारी आहे. एक कनिष्ठ सहकारी, आणि मित्रही. मी त्याला अनेक वर्षांपासून ओळखतो. तो आहे पुनीत शर्मा. कॅप्टन शर्मा, एक एअरलाइन कॅप्टन जो भारतीय वायू सेनेतून सेवानिवृत्त झालेला विंग कमांडर शर्मा देखील आहे. तो पंजाबचा आहे, पण वायू सेनेत असताना येथे बदली झाल्यानंतर त्याने स्वेच्छा निवृत्ती घेतली आणि आता तो पुण्यात स्थायिक झाला आहे. पुण्यातच तो एका विमान कंपनीत पायलट आहे, जिथे मी त्याचा ज्येष्ठ सहकारी आहे.

त्याचं वागणं नेहमी मैत्रीपूर्ण आणि विनम्र असतं. पण त्याच्यात काही विचित्र वागणूक मला फार पूर्वीच दिसली होती. तो रविवारी शक्यतो फ्लाईट करायचा नाही. आम्हा वैमानिकांना दर शनिवार-रविवार, म्हणजे वीकेंडला सुट्टी नसते. आम्हाला १६८ तास, म्हणजे ७ दिवस काम केल्यानंतर ३६ तासांची साप्ताहिक विश्रांती मिळते, त्यामुळे दर आठवड्याच्या वेगवेगळ्या दिवशी आमची सुट्टी असते, आणि तीही नेहमी घरी नसते. कधीकधी एखाद्याला दुसर्‍या गावी देखील सुट्टीचा दिवस मिळू शकतो.

आमचा दिनक्रम इतका वेगळा आणि अनियमित आहे की जेव्हा लोक मला याबद्दल विचारतात तेव्हा मी म्हणतो, ‘मी तीन दिवस बाहेर असतो आणि तीन दिवस घरी असतो; आणि माझी बायको तीन दिवस आनंदी असते, पण कोणते तीन दिवस, ते मला विचारू नका!’

तर अशा ह्या नोकरीत, पुनीतने आमच्या फ्लाईट शेड्युल करणार्‍यांना गुपचूप विनंती केली असावी, कारण तो रविवारी फ्लाईट करायचा नाही. मला वाटत होतं की तो ह्या बाबतीत जरा स्वार्थीपणा करत आहे, त्याच्या कुटुंबासमवेत रविवारी घरी राहण्यासाठी. मग कालांतराने, हळूहळू, मला पुनीतच्या रविवारच्या कार्यक्रमांबद्दल कळलं. काही फेसबुक पोस्ट मधून, काही उत्साही प्रशंसकांकडून आणि शेवटी त्याच्या TED Talks मधील भाषणातून.

पंजाबमध्ये जन्मलेल्या, आणि वायुसेनेत देशभर नोकरी केलेल्या या माणसाने पुण्याला आपलं गाव मानलं, आणि दर रविवारी आपल्या ‘स्वच्छ पुणे, स्वच्छ भारत’ उपक्रमाद्वारे तो पुण्यनगरीला साफ, हरित आणि सुशोभित करत होता.

ते काम फक्त रविवारी सकाळी त्याला शक्य होतं, कारण फक्त तेव्हाच त्याचे स्वयंसेवक, जे विद्यार्थी, नोकरी करणारे आणि व्यावसायिक आहेत, संपूर्ण आठवडा काम केल्यानंतर, आपलं घर आणि उबदार पांघरून सोडून, आपलं शहर स्वच्छ करण्यासाठी बाहेर पडू शकतात.

आपलं शहर, जिथे माझा जन्म १९६१ साली झाला असला तरी ज्यात सुधारणा करण्याचा किंवा ज्यासाठी काहीही करण्याचा मी विचार देखील कधी केला नव्हता, अधूनमधून स्थानिक सरकार आणि प्रशासनाला धड काम न केल्याबद्दल शिव्याशाप देण्याशिवाय. पुनीत आणि त्याचे स्वयंसेवी साथीदार पुणे रेल्वे स्थानकासारख्या सार्वजनिक ठिकाणी एकत्र येत आणि आसपासचा परिसर स्वच्छ करत. त्यानंतर त्यांनी सार्वजनिक भिंती आणि बरेच उड्डाणपूलही रंगवले.

अज्ञानी आणि कृतघ्न लोक पुनश्च थुंकून त्या भिंती घाण करतील किंवा कचरा टाकून रस्ते खराब करतील, हे माहीत असूनही, आणि त्या कामाचा एक पैसाही मिळात नसूनही, कोणताही स्वार्थ अथवा राजकीय आशीर्वाद नसताना त्याचे काम अथक चालू आहे. पण त्याची सर्वात मोठी कामगिरी म्हणजे हजारो तरुणांना सार्वजनिक कामासाठी वेळ देऊन श्रमदान करण्याला प्रेरित करणे ही. हेच त्याच्या नेतृत्वाचे खरे लक्षण आहे.

मी माझ्या कामात, माझ्या जीवनात आणि माझ्या छंदांमध्ये व्यस्त होतो, म्हणून त्याच्या कोणत्याही उपक्रमात कधी सामील झालो नाही, परंतु अधूनमधून सोशल मीडियावर आणि वैयक्तिकरित्या त्याचे कौतुक करायचो.

काल सकाळी, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त, पुनीतच्या अनेक उपक्रमांतर्गत ग्रीन हिल ग्रुपच्या वृक्षारोपण मोहिमेत मी भाग घेतला होता. पुनीतने ७५ कार्यक्रमांची योजना आखली होती, परंतु ती संख्या वाढत जाऊन शेवटी १०८ कार्यक्रमांपर्यंत पोचली. साहजिकच तो त्या सर्व कार्यक्रमांना उपस्थित राहू शकला नाही, परंतु आम्ही जिथे होतो त्या चतुश्रृंगी टेकडीसह काही ठिकाणी त्याने भेट दिली.

‘पुनीतजी आज स्वतः आपल्याला भेटायला येत आहेत’ हे मी ऐकल्यावर ते सर्व लोक त्याला किती मानतात हे मला जाणवलं.

जेव्हा कोणीतरी आम्ही दोघेही स्पाइसजेट या एकाच विमान कंपनीत पायलट असल्याचं सांगितलं तेव्हा चंद्राप्रमाणे, मी देखील त्याच्या प्रकाशझोतात क्षणभर चमकलो.

‘आज फ्लाइट कशी काय लागली तुझी?’ तो आल्यावर मी विचारलं, काल रविवार होता म्हणून नाही, तर त्याला खूप काम होतं म्हणून. ‘मी आज फ्लाइट न लावण्याची विनंती केली होती, परंतु ते लोक कदाचित विसरले,” तो कटुतेचा स्पर्श न दाखवत म्हणाला. ‘तुम्ही सिक लिव्ह का टाकत नाही?’ कोणीतरी विचारलं.

‘तसं करणं बरोबर होणार नाही,’ तो सहज म्हणाला. ‘हरकत नाही. आपल्याकडे भरपूर स्वयंसेवी आहेत जे माझ्याशिवाय देखील कामं चालू ठेवतील.’ ते ऐकल्यावर मला अचानक त्याच्यात एका विलक्षण आदर्शवादाची ठिणगी दिसली.

पहाटे ५ वाजता उठून, दिवसभर शहरात प्रवास करत, हजारो स्वयंसेवकांना कृतीतून प्रोत्साहन आणि मार्गदर्शन केल्यानंतर, तो फ्लाईट उडवायला गेला आणि त्याने आपले विमान सुरक्षितपणे दिल्लीला पोचवले.

अझीम प्रेमजी यांच्याबरोबर झालेल्या माझ्या भेटीबद्दल मी पूर्वी लिहिल्याप्रमाणे, मला पुन्हा ब. भ. बोरकरांचे अजरामर शब्द आठवले. दिव्यत्वाची जेथ प्रतीती, तेथे कर माझे जुळती. आता मला व्यग्र ठेवणारी माझी स्वार्थी कामं त्याच्या थोर उपक्रमांच्या तुलनेत क्षुल्लक वाटू लागली आहेत . त्याची पत्नी मीनाक्षी, आणि अपत्य अवीन आणि रम्या देखील त्याला त्याच्या कामात मदत करतात. तो माझा सहकारी आहे. एक कनिष्ठ सहकारी आणि मित्रही. मी त्याला अनेक वर्षांपासून ओळखतो. नाही, हे जरा चुकलंच. मला पुन्हा सांगू द्या. मी त्यांचा सहकारी आहे. एक वयस्कर सहकारी आणि मित्र देखील - आणि मला याचा अभिमान आहे. मला वाटत होतं की मी त्यांना अनेक वर्षांपासून ओळखतो, परंतु कालच त्यांची खरी ओळख पटली. ते आहेत पुनीत शर्मा. कॅप्टन शर्मा, एक एअरलाइन कॅप्टन जे भारतीय वायू सेनेतून सेवानिवृत्त झालेले विंग कमांडर शर्मा देखील आहेत. आणि ते पुनीतजी आहेत, एक प्रेरणादाई व्यक्तिमत्व आहेत.

(या लेखाचे लेखक कॅप्टन अविनाश चिकटे हे भारतीय वायू सेनेत लढाऊ वैमानिक होते आणि आता एका विमान कंपनीत ते व्यावसायिक वैमानिक आहेत. त्यांची तीन पुस्तके प्रकाशित झाली असून विविध विषयांवर अनेक लेख लिहिले आहे.)

IPL_Entry_Point