मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  अब्दुल सत्तारांचं आव्हान आदित्य ठाकरेंनी स्वीकारलं; सिल्लोडमध्ये जंगी सभा घेऊन बंडखोरांवर डागणार तोफ

अब्दुल सत्तारांचं आव्हान आदित्य ठाकरेंनी स्वीकारलं; सिल्लोडमध्ये जंगी सभा घेऊन बंडखोरांवर डागणार तोफ

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Nov 02, 2022 09:07 AM IST

aditya thackeray vs abdul sattar : सिल्लोड मतदारसंघात शिवसंवाद यात्रा काढून दाखवावी, असं आव्हान कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी आदित्य ठाकरेंना दिलं होतं. त्यानंतर आता शिवसेनेनं हे आव्हान स्वीकारलं आहे.

aditya thackeray vs abdul sattar
aditya thackeray vs abdul sattar (HT)

aditya thackeray vs abdul sattar : गेल्या काही दिवसांपासून राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्यात मोठा राजकीय संघर्ष पेटला आहे. आदित्य ठाकरे हे देशातील दुसरे पप्पू असून त्यांनी माझ्या सिल्लोड मतदारसंघात शिवसंवाद यात्रा काढून दाखवावी, असं आव्हान कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी ठाकरेंना दिलं होतं. त्यानंतर आता आदित्य ठाकरेंनी हे आव्हान स्वीकारलं असून येत्या सात नोव्हेंबरला आदित्य ठाकरे औरंगाबादच्या सिल्लोडमध्ये जंगी सभा घेणार असल्याची माहिती विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिली आहे. त्यामुळं आता अब्दुल सत्तार आणि आदित्य ठाकरेंमधील संघर्ष आणखी पेटण्याची शक्यता आहे.

महाविकास आघाडीचं सरकार असताना तात्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरेंनी राज्याचे दौरे न केल्याचा आरोप सातत्यानं शिवसेनेतील बंडखोरांकडून केला होता. त्यामुळं आता सत्तांतर झाल्यानंतर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंनी मराठवाड्याच्या विविध भागांचा दौरा सुरू केला आहे. सात नोव्हेंबरला आदित्य ठाकरे सिल्लोडसह पैठणमध्येही सभा घेणार असल्याचं बोललं जात आहे.

सत्तार-भुमरेंना शह देण्यासाठी शिवसेना आक्रमक...

जेव्हा एकनाथ शिंदेंनी शिवसेनेत बंड केलं होतं, त्यावेळी औरंगाबाद जिल्ह्यात सहापैकी पाच शिवसेनेच्या आमदारांनी ठाकरेंची साथ सोडत शिंदे गटाचा रस्ता धरला होता. त्यात अब्दुल सत्तार आणि संदीपान भुमरे हे मविआच्या मंत्रिमंडळात मंत्री होते. आता त्यांना शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळातही स्थान देण्यात आलं आहे. त्यामुळं आता या दोन्ही नेत्यांसह संजय शिरसाट, प्रदीप जैस्वाल आणि रमेश बोरनारे या आमदारांना शह देण्यासाठी शिवसेनेकडून जिल्हाभरात वातावरण पेटवलं जात आहे.

IPL_Entry_Point