मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  'उद्या हे म्हणतील की आदित्य निळं शर्ट घालतो म्हणून आम्ही शिवसेना सोडली'

'उद्या हे म्हणतील की आदित्य निळं शर्ट घालतो म्हणून आम्ही शिवसेना सोडली'

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Aug 01, 2022 01:16 PM IST

Aaditya Thackeray in Sindhudurg: निष्ठा यात्रेच्या निमित्तानं सिंधुदुर्ग जिल्ह्यात असलेले शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी आज बंडखोरांवर तुफान हल्लाबोल केला.

Aaditya Thackeray
Aaditya Thackeray

Aaditya Thackeray in Sindhudurg: शिवसेनेतील बंडाळीनंतर आणि शिवसेनेच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी सुरू केलेली निष्ठा यात्रा आज सिंधुदुर्गात पोहोचली. तिथं शिवसैनिकांच्या समोर बोलताना आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेतील बंडखोर आमदारांवर जोरदार हल्लाबोल केला. 'ईडीच्या भीतीपोटी व सत्तेच्या लालसेपोटी गेलेले गद्दार रोज वेगळी कारणं सांगत आहेत. आदित्य निळं शर्ट घालतो म्हणून आम्ही शिवसेना सोडली असं सांगायलाही उद्या हे कमी करणार नाहीत,' असा ठाकरी टोला आदित्य यांनी हाणला.

सिंधुदुर्गात आज आदित्य ठाकरे यांनी जोरदार भाषण केलं. बंडखोरांनी केवळ शिवसेना आणि महाराष्ट्राशीच नव्हे तर माणुसकीशी गद्दारी केली आहे. उद्धव ठाकरे हे आजारी असताना त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला. वार करायचाच होता तर छातीवर करायचा, पाठीत का?,' असा सवालही त्यांनी बंडखोरांना केला. 'शिवसेना सोडल्यानंतर हे लोक रोज काहीतरी वेगळी कारणं देत आहेत. कधी म्हणतात अजित पवारांनी निधी दिला नाही. कधी म्हणतात उद्धव ठाकरे भेटत नव्हते. कधी म्हणतात संजय राऊतांमुळं ही वेळ आली. उद्या हे म्हणतील की आदित्य ठाकरे निळं शर्ट घालतो म्हणून आम्ही शिवसेना सोडली, असा सणसणीत टोला त्यांनी हाणला.

'आम्हीच शिवसेना आहोत आणि आम्हीच शिवसैनिक आहोत' असा दावा एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या सोबत गेलेले सर्व आमदार, खासदार करत आहेत. त्याचाही आदित्य ठाकरे यांनी खरपूस समाचार घेतला. ‘गुवाहाटीमधील चित्र संपूर्ण देशानं पाहिलं आहे. गुवाहाटीमध्ये एका बाजूला महापूर आला होता. लोक संकटात होते. दुसऱ्या बाजूला हे गद्दार हॉटेलमध्ये मजा मारत होते. महापूर आला असताना धिंगाणा घालणाऱ्यांना तुम्ही शिवसैनिक म्हणाल का? गोव्यातही ह्यांनी असाच धिंगाणा घातला. टेबलावर नाचणारे तुमचे नेते, लोकप्रतिनिधी आणि महाराष्ट्राचे चेहरे होऊ शकतात का?,’ असा प्रश्न आदित्य यांनी केला.

थोडी जरी लाज असेल तर निवडणुकीच्या रिंगणात या!

‘या गद्दारांना अजीर्ण होईल इतकं पक्षानं दिलं. शिवसैनिक इकडं त्यांना मान देत होते. त्यांना नमस्कार करत होते. त्यांच्या समोर झुकत होते. असं सगळं असताना ह्या गद्दारांना तिकडं जाऊन लोटांगण घालायची, वाकायची, झुकायची काय गरज होती? किती घाणेरडं राजकारण केलं ह्यांनी? एक तरुण लोकप्रतिनिधी म्हणून तरुणांना राजकारणात यायला कसं सांगायचं असा प्रश्न आता माझ्यापुढं आहे. थोडी जरी लाज शिल्लक असेल तर आमदारकीचे राजीनामे देऊन निवडणुकीच्या रिंगणात या. मग सत्य जिंकतं की सत्ता ते तुम्हाला कळेल,’ असं आव्हान आदित्य ठाकरे यांनी दिलं.

IPL_Entry_Point