मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Yoga Mantra: नियमित करा या योगासनांचा सराव, सकाळचा आळस होईल दूर
बालासन
बालासन (freepik)

Yoga Mantra: नियमित करा या योगासनांचा सराव, सकाळचा आळस होईल दूर

18 March 2023, 8:24 ISTHiral Shriram Gawande

प्रत्येकाला निरोगी रहायचे असते पण व्यायाम करण्यासाठी सकाळी उठायचे म्हटले की कंटाळा येतो. सकाळचा आळस दूर पळण्यासाठी तुम्ही हे योगासने करु शकता.

Yogasana for Morning Laziness: व्यायाम करण्यासाठी सकाळी लवकर उठायचे म्हटले की लोकांना कंटाळा येतो. फिटनेस तर हवा असतो पण त्यासाठी लवकर उठणे नको असते. त्यामुळे संपूर्ण दिवस आळसात जातो. सकाळचा हा आळस, सुस्ती दूर करण्यासाठी तुम्ही काही योगासने करू शकता. तुमची सकाळ योगाने सुरू करण्याचा प्रयत्न करा कारण ते तुमचे शरीर आणि मन शांत करेल. योग तुम्हाला दिवसभर उत्साही ठेवेल आणि सांधेदुखी किंवा स्नायू कडक होणे या सामान्य समस्यांपासून आराम देईल. येथे अशी योगासने आहेत, ज्याच्या मदतीने तुम्ही सकाळचा आळस दूर करू शकता.

ट्रेंडिंग न्यूज

विरभद्रासन

विरभद्रासनाचा सराव केल्याने तुमचे खांदे मजबूत होतात, संतुलन आणि स्थिरता सुधारते. हे योग आसन संपूर्ण शरीराला ऊर्जा देण्यासाठी ओळखले जाते, जे तुम्हाला दिवसभर सक्रिय ठेवते. हे करण्यासाठी, डाव्या गुडघ्यावर ९० अंशांचा कोन बनवून पुढे जा. लक्षात ठेवा की तुमचा गुडघा पायाच्या बोटाच्या पुढे जाऊ नये. आता नमस्कार स्थितीत या आणि वर पहा, आपले हात आपल्या डोक्यावर वर करा. नंतर वाकून आपली पाठ थोडीशी ताणून घ्या. काही सेकंद धरा आणि दुसऱ्या बाजूने पुन्हा करा.

त्रिकोनासन

त्रिकोनासन उभे राहून केले जाते आणि ते डाव्या आणि उजव्या दोन्ही बाजूंनी केले जाते. हे आसन केल्याने मुख्य स्नायू सक्रिय होण्यास मदत होते, ज्यामुळे संतुलन आणि स्थिरता राहण्यास मदत होते. हे आसन करण्यासाठी उभे राहा आणि नंतर पायांमध्ये ३-४ फूट अंतर ठेवा. उजवा पाय बाहेर वळवा आणि धड समोर ठेवून दोन्ही हात खांद्याच्या पातळीवर बाजूला पसरवा. उजवा हात कंबरेपासून वाकवून उजव्या पायाला स्पर्श करा. हे करत असताना डावा हात थेट कानाच्या वर ताणला जाईल.

बालासन

हे आसन छाती, पाठ आणि खांद्यावरील तणाव दूर करण्यास मदत करते. यासोबतच दिवसा किंवा व्यायामादरम्यान चक्कर आल्यास किंवा थकल्यासारखे वाटत असल्यास हे आसन देखील मदत करते. हे पाठदुखीपासून मुक्त होण्यास मदत करते. कारण ते पाठ, नितंब, मांड्या आणि घोट्यासाठी एक चांगला ताण आहे आणि तुम्हाला दिवसभर उत्साही ठेवते. हे करण्यासाठी, गुडघ्यावर आरामात बसा. आपले धड आपल्या टाचांवर टेकवा आणि नंतर पुढे वाका. श्वास सोडताना, शरीराचा वरचा भाग पुढे वाकवा. नंतर आपले कपाळ खाली करा आणि आपली मानेला आराम द्या.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

विभाग