World Book Day 2024 : जागतिक पुस्तक दिनानिमित्त डोंबिवलीत साकारणार बुक स्ट्रीट, जाणून घ्या डिटेल्स!
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  World Book Day 2024 : जागतिक पुस्तक दिनानिमित्त डोंबिवलीत साकारणार बुक स्ट्रीट, जाणून घ्या डिटेल्स!

World Book Day 2024 : जागतिक पुस्तक दिनानिमित्त डोंबिवलीत साकारणार बुक स्ट्रीट, जाणून घ्या डिटेल्स!

Apr 17, 2024 09:31 PM IST

Weekend Events In Mumbai: वाचन संस्कृती वृध्दींगत व्हावी या हेतूने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या.

Book Street at Dombivli
Book Street at Dombivli

Book Street at Dombivli: जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्ताने 'पै फ्रेंड्स लायब्ररी'च्या वतीने 'पुंडलिक पै' यांच्या संकल्पनेतून बुक स्ट्रीट या अनोख्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. गतवर्षीपासून सुरू झालेल्या भारतातील या पहिल्यावहिल्या उपक्रमामध्ये वाचन प्रेमींसाठी विनामूल्य पुस्तक प्रदान करण्यात येणार आहे. सांस्कृतिक नगरी डोंबिवली मधील फडके रोडवर रविवार, दिनांक २१ एप्रिल रोजी सकाळी ५ वाजता बुक स्ट्रीटचे उद्घाटन करण्यात येणार असून सकाळी १० वाजेपर्यंत हा बुक स्ट्रीट रसिक वाचकांसाठी खुला रहाणार आहे.

जाणून घ्या महत्त्वाचे डिटेल्स

वाचन संस्कृती वृध्दींगत व्हावी या हेतूने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमामध्ये रसिकांना कूपनद्वारे प्रवेश दिला जाणार असून त्यावर तिथे उपलब्ध असलेले कोणतेही एक पुस्तक पूर्णपणे मोफत निवडता येणार आहे. पुस्तकांपासून तयार केलेली 'आय लव्ह बुक्स' ही प्रतिकृती यंदाच्या बुक स्ट्रीटचे खास आकर्षण असणार आहे. गतवर्षी ४५०० वाचकांनी या उपक्रमाला भेट दिली होती, तर यंदाचे वर्षी सहा हजार वाचनप्रेमी उपस्थित राहतील असा अंदाज आयोजकांनी व्यक्त केला आहे. बुक स्ट्रीट उपक्रम यशस्वी होण्यास कल्याण डोंबिवली महानगरपलिका, डोंबिवली शहर वाहतूक विभाग आणि डोंबिवली शहर पोलिस विभाग यांचे विशेष सहकार्य लाभणार आहे. अधिक माहितीसाठी ७५०६२९६०३४ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन 'पै फ्रेंड्स लायब्ररी'च्या वतीने करण्यात आले आहे.

International Children's Book Day 2024: का साजरा करतात आंतरराष्ट्रीय बाल पुस्तक दिन? जाणून घ्या

पुस्तक दिनाचे महत्त्व काय?

दरवर्षी २३ एप्रिल रोजी ‘जागतिक पुस्तक दिन’ साजरा केला जातो. याला जागतिक पुस्तक आणि कॉपीराइट दिन असेही म्हणतात. पुस्तकांचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी जगभरात जागतिक पुस्तक दिन साजरा केला जातो. तसं पाहिलं तर पुस्तकांना आपल्या जीवनात खूप महत्त्व आहे. ते इतिहास आणि भविष्यातील पूल मानले जातात. या विशेष दिवशी, युनेस्को आणि त्याच्या इतर भागीदार संस्था येत्या वर्षासाठी 'वर्ल्ड बुक कॅपिटल' निवडतात. जगभरात जागतिक पुस्तक दिन साजरा करण्यामागचा उद्देश लोकांना पुस्तकांचे महत्त्व कळावे हा आहे. पुस्तके ही आपल्या भूतकाळाचा आरसा आहेत आणि आपल्या भविष्यासाठी मार्गदर्शक आहेत. अशा परिस्थितीत त्यांचे महत्त्व आपल्या जीवनात कमी नाही.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही.)

Whats_app_banner