मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Mohandas Sukhtankar : ‘कार्यकर्ता कलावंत’ हरपला! ज्येष्ठ रंगकर्मी मोहनदास सुखटणकर यांचं निधन

Mohandas Sukhtankar : ‘कार्यकर्ता कलावंत’ हरपला! ज्येष्ठ रंगकर्मी मोहनदास सुखटणकर यांचं निधन

Harshada Bhirvandekar HT Marathi
Dec 06, 2022 01:16 PM IST

Mohandas Sukhtankar : मराठी रंगभूमी गाजवणारे ज्येष्ठ रंगकर्मी मोहनदास सुखटणकर यांचं आज मुंबईतील राहत्या घरी निधन झालं.

Mohandas Sukhtankar
Mohandas Sukhtankar

Mohandas Sukhtankar : मराठी रंगभूमी गाजवणारे ज्येष्ठ रंगकर्मी मोहनदास सुखटणकर यांचं आज मुंबईतील राहत्या घरी निधन झालं. वयाच्या ९३व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मुळचे गोव्याचे असणाऱ्या मोहनदास सुखटणकर यांनी ‘द गोवा हिंदू असोसिएशन’ या संस्थेतून अनेक नाटकं गाजवली. कलाकार म्हणून रंगभूमीवर प्रवेश केलेल्या मेहनदास यांनी पुढे ‘द गोवा हिंदू असोसिएशन’चा खंदा कार्यकर्ता म्हणून काम पाहिले. केवळ नाटकच नव्हे, तर मराठी चित्रपटांमधूनही त्यांनी दमदार भूमिका केल्या. अगदी शालेय वयापासून त्यांनी आपल्या अभिनय प्रवासाला सुरुवात केली होती.

गोव्यातील माशेल गावाच्या सुखटणकर कुटुंबात मोहनदास यांचा जन्म झाला. त्यांचे आजोबा आणि वडील प्रसिद्ध वैद्य होते. त्यांच्या कुटुंबात वैद्यकीय परंपरा असताना मोहनदास मात्र नाट्यसृष्टीकडे वळले. शाळेत असतानाच शिक्षकांच्या आग्रहामुळे त्यांनी शाळेतील एका नाटुकलीत भाग घेतला होता. या नाटकाचं नाव होतं ‘खोडकर बंड्या’. या नाटकातून त्यांच्यातील कलाकाराला वाव मिळाला. मोहनदास यांनी प्राथमिक शिक्षण म्हापशातील शाळेत पूर्ण केलं. मॅट्रीकच्या परीक्षेसाठी ते मुंबईच्या दिशेने रवाना झाले. परीक्षा झाल्यानंतर त्यांनी नोकरीसाठी शोधाशोध सुरु केली. या दरम्यान त्यांनी टंकलेखक आणि लिपिक म्हणून काम केले.

पुढील शिक्षणसाठी त्यांनी जयहिंद महाविद्यालयात प्रवेश घेतला. याच ठिकाणी त्यांच्यातील अभिनेत्याला आपलं कौशल्य दाखवण्याची संधी मिळाली. कॉलेजमध्ये असताना त्यांना सुनील दत्त, आत्माराम भेंडे, आशालता भेंडे, बबन प्रभू, रमेश चौधरी अशा कलाकार मंडळींची साथ लाभली. पुढे ‘द गोवा हिंदू असोसिएशन’मध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांनी ‘संशयकल्लोळ’, ‘संगीत शारदा’, ‘मृच्छकटीक’, ‘होनाजी बाळा’ अशी नाटकं गाजवली. नाटकातील एखादा कलाकार गैरहजर असेल, तर नाटकाचा प्रयोग रद्द होऊ न देता त्या ठिकाणी समर्थपणे उभं राहून ती भूमिका सादर करण्याचं कौशल्य मोहनदास सुखटणकर यांच्याकडे होतं. नाटकांप्रमाणेच त्यांनी ‘कैवारी’, ‘जावई माझा भला’, ‘चांदणे शिंपीत जा’, ‘प्रेमांकुर’, ‘निवडुंग’, ‘थोरली जाऊ’, ‘वाट पाहते पुनवेची’, ‘जन्मदाता’, ‘पोरका’ अशा मराठी चित्रपटांतही काम केलं. तर, काही मराठी आणि हिंदी मालिकांमधून देखील ते प्रेक्षकांच्या भेटीला आले.

IPL_Entry_Point