Sridevi-Kamal Haasan Story: अभिनेत्री श्रीदेवी आज जरी या जगात नसली, तरी तिच्या आठवणी मात्र आजही चाहत्यांच्या मनात ताज्या आहेत. हिंदी चित्रपटसृष्टीत काम करण्यापूर्वी श्रीदेवीने तामिळ इंडस्ट्रीवर बराच काळ राज्य केले. साऊथच्या अनेक बड्या कलाकारांसोबत तिची जोडी पडद्यावर गाजली होती. कमल हासन हे देखील त्यापैकीच एक नाव होते. श्रीदेवी आणि कमल हासन यांनी तमिळमध्ये 'गुरु', 'वरुमायिन निरम शिवप्पू', 'वाजवे मायाम' आणि 'मूंद्रम पिराई' यासारखे चित्रपट केले. त्यांची जोडी मोठ्या पडद्यावर फार गाजली होती. अशावेळी चाहत्यांना वाटत होते की, त्यांनी खऱ्या आयुष्यात देखील एकमेकांना डेट करायला हवे. मात्र, तसे होऊ शकले नाही.
इतकंच नाही तर, श्रीदेवीच्या आईने आपल्या मुलीच्या लग्नाचा प्रस्ताव कमल हासनसमोर ठेवला होता. मात्र, त्यांनी तो नाकारला. याचा खुलासा खुद्द कमल हासनने केला होता. श्रीदेवीच्या मृत्यूनंतर कमल हासनने 'द २८ अवतार्स ऑफ श्रीदेवी’ नावाची एक नोट लिहिली होती, ज्यामध्ये त्यांनी श्रीदेवी त्यांची जवळची मैत्रीण असल्याचे लिहिले होते. यातच त्यांनी म्हटले होते की, श्रीदेवीच्या आईने आपल्या मुलीसोबत लग्न करण्याची विनंती केली होती. पण, श्रीदेवीच्या आईच्या मागणीला त्यांनी नकार दिला होता.
आपण श्रीदेवीला नकार का दिला, याच कारण पण कमल हासन यांनी संगीत्लेहोते. कमल हासन यांनी लिहिले की, ‘मी आणि माझी आई अनेकदा श्रीदेवीच्या लग्नावर चर्चा करायचो. कदाचित मी त्यांच्या मुलीशी लग्न करावे, अशी त्यांची इच्छाच होती. पण मी हसलो आणि उत्तर दिले की, आम्ही एकमेकांशी लग्न केले तर, श्री आणि मी दोघेही एकमेकांना इतके वेड्यात काढू की, मला दुसऱ्याच दिवशी तिला पुन्हा घरी परत पाठवावे लागेल.’
श्रीदेवी आणि कमल हासन यांची पहिली भेट तामिळ चित्रपट 'मौंद्रु मुदिचू'च्या सेटवर झाली होती. त्यानंतर दोघे चांगले मित्र बनले होते. या दरम्यान त्यांच्या डेटिंगच्या अफवाही पसरल्या होत्या. मात्र, दोघांनीही नेहमीच त्या फेटाळून लावल्या. इतकंच नाही, तर श्रीदेवी कमल हसन यांना नेहमी सर म्हणायची. यानंतर कमल हासन यांनी लग्न करून संसार थाटला. तर, श्रीदेवीने देखील बोनी कपूरसोबत लग्न केले.