Maharashtra Shahir Marathi Movie: महाराष्ट्रात सध्या ‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. ‘महाराष्ट्र शाहीर’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर देखील चांगलाच धुमाकूळ घालत आहे. अनेक ठिकाणी या चित्रपटाला शो कमी मिळत असले, तरी प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. महाराष्ट्रातील नेते मंडळी देखील आता या चित्रपटाचं कौतुक करताना दिसत आहेत. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी नुकताच ‘महाराष्ट्र शाहीर’ हा चित्रपट पाहिला. ‘महाराष्ट्र शाहीर’ हा चित्रपट पाहिल्यानंतर आता बाळासाहेब थोरात यांना देखील शाहीर साबळे यांची आठवण आली आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित या चित्रपटाचे कौतुक केले आहे.
‘शाहीर कृष्णराव साबळे यांच्या जीवनावर आधारित ‘महाराष्ट्र शाहीर’ हा सिनेमा नुकताच बघितला. केदार शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे या उत्तम कलाकृतीसाठी मनापासून अभिनंदन. अंकुश चौधरी यांनी आपल्या कसदार अभियानातून शाहीर साबळे यांची व्यक्तिरेखा जिवंत केली आहे. सना शिंदेने साकारलेली भानुमती आणि अन्य कलाकारांनी साकारलेल्या व्यक्तिरेखा स्मरणात राहतात. अजय-अतुल यांनी संगीतबद्ध केलेली गाणी अख्खा महाराष्ट्र गुणगुणतोय. हा सिनेमा बघताना इतिहासाचा एक कालखंड नजरेसमोर उभा झाला. अनेक चळवळींच्या आठवणी ताज्या झाल्या, त्या काळातले राजकारण, समाजकारण, साहित्य आणि संस्कृती पुन्हा एकदा अनुभवता आली’, असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
तर, शाहीर साबळे यांची आठवण शेअर करताना त्यांनी लिहिले की, ‘माझ्या विद्यालयीन काळात मी संगमनेरला अमर शेख, शाहीर साबळे यांना ऐकले आहे. माझे कुटुंब पुरोगामी विचारांचे असल्यामुळे सुरुवातीपासूनच या मंडळींसोबत वैचारिक नाळ जुळलेली होती. या व्यक्तिमत्त्वांच्याबद्दल माझ्या मनात कायम जिव्हाळ्याची भावना राहिली. अनेक सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये किंवा मंचावर शाहीर साबळे यांना मी बघत आलो. एक प्रसंग आजही माझ्या डोळ्यासमोर जिवंत आहे. १९९० सालच्या दरम्यानची ही घटना आहे. आकाशवाणी आमदार निवासातल्या कॅन्टीन मधली. बहुतांश आमदार मंडळी तेव्हा कॅन्टीन मध्येच जेवायची. आमदारांना बसण्यासाठी कॅन्टीनमध्ये स्वतंत्र विभागही तयार करण्यात आलेला होता. त्या दिवशी माझ्या लक्षात आलं की, शाहीर साबळेसुद्धा कॅन्टीनमध्ये आले आहे. ते बसायला जागाच शोधत होते. मी शाहिरांना आवाज दिला, त्या दिवशी आम्ही एकत्र जेवण केलं. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीवर आम्ही त्या दिवशी गप्पा मारल्या. शाहीर साबळे यांच्या मनात पुरोगामी विचारांबद्दल असलेली आस्था त्या दिवशी मी अत्यंत जवळून अनुभवली. आज त्यांचा चरित्रपट बघताना आनंद वाटत होता.’
बाळासाहेब थोरात यांची पोस्ट वाचून निर्माते-दिग्दर्शक केदार शिंदे देखील भारावून गेले आहेत. त्यांनी देखील ही पोस्ट शेअर करून बाळासाहेब थोरात यांचे आभार मानले आहेत. ‘मनापासून धन्यवाद’ म्हणत त्यांनी ही पोस्ट शेअर केली आहे.
संबंधित बातम्या